समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव; एसबीआय कडा शाखेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात ---------------- रक्तदानातून मानवतेचा हात, वृक्षारोपणातून पर्यावरणाला साद; ६५ जणांचे रक्तदान, स्मशानभूमीत २५ वृक्षांची लागवड

 समाजसेवेचा प्रेरणादायी उत्सव; एसबीआय कडा शाखेचा ७१ वा वर्धापन दिन उत्साहात
----------------
रक्तदानातून मानवतेचा हात, वृक्षारोपणातून पर्यावरणाला साद; ६५ जणांचे रक्तदान, स्मशानभूमीत २५ वृक्षांची लागवड







------------------

राजेंद्र जैन / कडा

---------------

येथील भारतीय स्टेट बँकेच्या कडा शाखेचा ७१ वा वर्धापन दिन समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच कडा येथील स्मशानभूमी परिसरात विविध प्रजातींच्या २५ वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शाखा व्यवस्थापक प्रशांत झाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते वड, पिंपळ, चिंच, खाया, कंदमवा, उंबर, कांचन, लक्ष्मी तारू आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर हरित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.


दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्याचा बँकेच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखा व्यवस्थापक प्रशांत झाडे यांच्यासह प्रशांत गायधने, शुभम पाटील, विवेककुमार, अमितकुमार, अंगत बांगडकर, गौरव दसरे, ऋषिकेश अगरे, वेंकट गर्जे, भरत धुमाळ, बाळू बोकेफोड, लक्ष्मण मुटकुळे, अमोल जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि मानवसेवा या त्रिसूत्रीचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

-------%-------

◼️ 


'एक झाड म्हणजे भविष्यासाठीचा श्वास' : विश्वजीत खुळे


 "कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजनचे अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येकाने जवळून अनुभवले. कृत्रिम ऑक्सिजन काही काळासाठी जीवन वाचवू शकतो; मात्र निसर्गाने दिलेला शुद्ध प्राणवायू केवळ झाडांमधूनच मिळतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आयुष्यात किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. आज लावलेले छोटे रोप उद्याच्या पिढ्यांसाठी जीवनदायी वटवृक्ष ठरणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण हीच खरी समाजसेवा असून, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांनी केले.

-------%------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.