कांद्याची पट्टी हातात... पण नियतीने हिरावला जीव
-----------------
बाजार समितीत कांदा विकून गावी परतणाऱ्या शेतकऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू; समोरासमोरच्या धडकेत दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी
---------------
राजेंद्र जैन / कडा
---------------
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री करून मेहनतीचे मोल हातात घेऊन आनंदाने गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यावर नियतीने काळाचा घाला घातल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी घडली. कडा–धामणगाव मार्गावरील सासू–सुनेच्या माळाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन पाथर्डी तालुक्यातील सोनाळवाडी येथील शेतकरी प्रभाकर भिवा सोनाळे (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील माणिकदवंडी परिसरातील सोनाळवाडी येथील शेतकरी प्रभाकर भिवा सोनाळे हे बुधवारी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव असल्याने आपला कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते. लिलाव पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कांद्याची विक्री करून पट्टी घेतली आणि दुचाकीवरून गावाकडे परतण्यास सुरुवात केली.
सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास कडा–धामणगाव मार्गावरील सासू–सुनेच्या माळाजवळ त्यांच्या दुचाकीची लिंबोडीकडे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की प्रभाकर सोनाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील मच्छिंद्र नवनाथ आंधळे (रा. लिंबोडी, ता. आष्टी) हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. गंभीर अवस्थेतील आंधळे यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
--------%-------
कांद्याची विक्री करून कष्टाचे मोल घेऊन घराकडे निघालेल्या शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सोनाळवाडीसह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. मेहनतीच्या घामाचे चीज झाल्याचा आनंद साजरा करण्याआधीच नियतीने त्यांच्यावर काळाचा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
-------%------


stay connected