गुरुवारी संपन्न होणार रोडागिरी बाबा यात्रा उत्सव; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

 

गुरुवारी संपन्न होणार रोडागिरी बाबा यात्रा उत्सव; हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित



आष्टी | प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील हिवरा, डोंगरगण, दादेगाव, भोजेवाडी आणि सुलेमान देवळा या गावांचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असलेल्या हजरत रोडागिरी बाबा यांच्या वार्षिक यात्रा उत्सवाचे आयोजन गुरुवार, दि. ३० जुलै रोजी करण्यात आले असून, यात्रेसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.

रोडागिरी बाबांच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, अहमदनगर तसेच आष्टी तालुक्यासह परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. दिवसभर दर्शन, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेतील विविध उपक्रमांचा भाविक आनंद घेतात.

यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली चार गावांच्या मानाच्या काठ्यांची भव्य मिरवणूक पारंपरिक लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात येणार आहे. यावेळी गावभर शेरणीचे वाटप करण्यात येणार असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोडागिरी बाबा दर्ग्यावर भाविक विविध नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर मोठ्या श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी ते येथे येतात. स्थानिकांच्या मते, एकेश्वरवादाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारतभर भ्रमण करणाऱ्या सूफी संतांपैकी रोडागिरी बाबा हे एक होते.

रोडागिरी बाबांचे बंधू कड्याचे मौलअली बाबा तसेच धामणगावचे सय्यद बादशाह बाबा यांची देवस्थानेही आष्टी तालुक्यात प्रसिद्ध असून, या ठिकाणच्या पुरातन दर्ग्यांचे वास्तुशिल्प भाविक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. याबाबतची माहिती दर्ग्यावरील मुजावरांनी दिली.

यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी यंदा टेम्भी आई मंदिराजवळ वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्गा परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आला असून, परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

यात्रा उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी हिवरा, डोंगरगण व दादेगाव येथील सरपंच मंडळी तसेच यात्रा समितीने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आणि शांततेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर