जनतेच्या कामात अडथळा आणल्यास किरीट सोमय्यांच्या तोंडाला काळे फासणार; जय हिंद सेनेचा इशारा

 जनतेच्या कामात अडथळा आणल्यास किरीट सोमय्यांच्या तोंडाला काळे फासणार; जय हिंद सेनेचा इशारा



सांगली | प्रतिनिधी

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्याच्या पार्श्वभूमीवर जय हिंद सेनेने तीव्र आक्षेप नोंदवला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, जनतेच्या कामात अडथळा निर्माण केल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जय हिंद सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिला आहे.

जय हिंद सेनेच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चंदन चव्हाण म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्याकडे कोणतेही घटनात्मक अथवा शासकीय पद नसताना त्यांना महापालिकेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची परवानगी कशी देण्यात आली? तसेच त्या बैठकीस अधिकारी कोणत्या आदेशानुसार उपस्थित राहिले, याचा खुलासा महापालिका आयुक्तांनी करावा.

यासंदर्भात शासनाचा कोणताही निर्णय अथवा अधिकृत आदेश होता का, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रशासनावर दबाव टाकणे योग्य नसून, अशा प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

जय हिंद सेनेच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जैलाबद्दीन शेख, जय हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, नासिर शेख, प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.