वारी म्हणजे संतांनी घातलेली अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड - ह भ प मोरेश्वर महाराज मोरे
ह भ प .मोरेश्वर महाराज मोरे यांनी वारीमध्ये शोधला संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन.
🚩🚩👏👏पंढरीची वारी । आहे माझे घरीं ।आणिक न करी । तीर्थ व्रत ॥१॥व्रत एकादशी करीन उपवासी ।गाईन अहर्निशीं मुखीं नाम ॥२॥नाम विठोबाचें घेईन मी वाचे ।बीज कल्पांतींचे तुका म्हणे ॥३॥
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगा प्रमाणे पांडुरंगाची चरण सेवा ही आमची परंपरा आहे वारकरी परंपरेमध्ये जन्मण्याचे भाग्य मला जन्मतःच लाभले हे माझे परम भाग्य.ही वारी परंपरा आजची नाही खुद्द भगवान महादेव हे पंढरीचे पहिले वारकरी मानले जातात.
( एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव )
हे पंढरीच्या वारीचे पहिले वारकरी मानले जातात! तिथून पुढे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधीस्थ विश्व माउली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज , श्री संतनामदेव महाराज ,संत जनाबाई संत चोखामेळा, श्रीसंत सावता महाराज ,श्रीसंत गोरोबाकाका श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज ते जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंत अनेक संत महात्म्यांनी ही वारीची भक्तीची पताका डोलाने फडकावत ठेवली अनेक संतांनी या भक्तीपरंपरेचा प्रसार करत समाजाला भक्ति समता आणि मानवतेचा संदेश दिला. जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचे धाकटे सुपुत्र श्री संत तपोनिधी नारायण महाराज यांनी इसवी सन १६८५ मध्ये संतांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरकडे प्रस्थान करण्याची परंपरा सुरू केली त्याचबरोबर ज्ञानोबा-तुकाराम या अखंड नाम गजराची सुरुवात झाली या परंपरेला यंदा ३४१ वर्ष पूर्ण होत आहेत.दरवर्षी आषाढी वारी करिता राज्यासह देश विदेशातून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात.सुमारे ३० ते ४० लाख वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीकडे वाटचाल करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंशिस्त भक्ती आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आजचा तरुणाईला संतांनी घालून दिलेली (Life Management) म्हणावी लागेल.आजचा तरुण पिढीला माझे हेच आवाहन आहे की वारीही केवळ एक धार्मिकयात्रा नसून ती 'यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे' असे म्हणणे उचित ठरणार नाही . वारीमध्ये चालत असताना प्रत्येक पाऊल हे मोक्षाच्या दिशेने असते असे संत वाङ्मयातील अनेक दाखले देता येतील एवढेंच नाही तर जीव शिव ऐक्याचे प्रतीक आपल्याला वारीमध्ये आढळून येते त्याच बरोबर वारीमध्ये कुठल्याही प्रकारची विषमता नसते.संतांनी सांगितले आहे.
खट नट यावे शुद्ध होऊनीया जावे दवंडी पिटी भावे चोखामेळा '
त्याचबरोबर सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे '
राजा ,रंक, श्रीमंत, गरीब, सगळे एकाच रांगेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरीच्या वाटेवर कोणालाही अभिमान राहत नाही.
'अभिमान नुरे कोड अवघेची पुरे '
पंढरीच्या वाटेने प्रत्येक जण एकमेकांचे दर्शन घेतो कारण
' पंढरीशी कोणा नाही अभिमान पाया पडे जन एकमेका'
ही संतांनी दिलेली शिकवण म्हणजे प्रत्येकाचा लहान असो वा मोठा त्यांचा आदर करणे हे आपणास यातून शिकावयास मिळते,
त्याचबरोबर घरदार काम धंदा सोडून 15 ते 20 दिवस ज्या वेळेला आपण पायी चालतो त्यावेळेला आपला आरोग्याच्या दृष्टीने व्यायामही होतो. असा संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वारीमध्ये आपल्याला पहावयास मिळतो भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर मुखामध्ये नाम, हातामध्ये टाळ, डोक्यावर तुळशी वृंदावन, मृदंगाचा गजर सर्व आसमंत दुमदुमून टाकतो.वाटेत एकमेकांना पाणी देणे, जेवणाची पंगत देणे, म्हणजेच अन्नदान ,औषधे देणे यातून सेवाभाव वृत्ती दिसून येते.
सेवा करा हो सेवा हाच पुण्याईचा ठेवा आणि हीच खरी ईश्वर सेवा
हे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे वचन आपणाला विसरून चालणार नाही. माय बाप हो आपल्या भागामध्ये अनेक थोर संत मंडळी होऊन गेले. त्यामध्ये प्रामुख्याने वैकुंठवासी गुरुनाम गुरु वैराग्यमूर्ती मदन महाराज बिहानी, श्री संत भागवत बाबा चिखनीकर,श्री संत शामसुंदर महाराज पुरी,श्री संत स्वानंद सुखनिवासी दिघे महाराज,श्री संत सद्गुरु रघुनाथ महाराज उंब्रेकर (वृद्धेश्वर), गहिनीनाथ गडाचे महंत सद्गुरु श्री संत वामन भाऊ,तारकेश्वर गडाचे महंत श्री संत नारायण महाराज,भगवान गडाचे निर्माते श्री संत भगवान बाबा , श्री संत भीमसिंह महाराज, श्री संत गव्हाणे बाबा,श्री संत श्री संत तनपुरे बाबा , श्री संत कैकाडी महाराज,नुकतेच ज्यांचे निर्यान झाले ते संत चरणरज बाळनाथ गडाचे महंत श्री संत छगन महाराज मालुसरे'
पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे .
माय बाप हो अशा अनेक थोर तपस्वी नाम धारकांनी विठुरायाच्या नामस्मरणाचे व वारीचे बाळकडू तुम्हा आम्हाला पाजले त्यांच्याच शिकवणीतून तुम्ही आम्ही आज वारी करतो हे आपले भाग्य,
(आठवड,अंभोरा,सालेवडगाव ,वाघळुज,सुलेमान देवळा,चिचोंडी पाटील,नांदूर विठ्ठलाचे )
अशा अनेक गावातील आपल्या पंचक्रोशीतील वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरीच्या दिशेने प्रतिवर्षी वारी करतात.
जसे 'गर्भाचे आवडी मातेचा सोहळा त्याप्रमाणे आपल्या वारकऱ्यांचे आवडी वारीचा सोहळा'
वारी म्हटल्यावर काळीज भरून येतं संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विचारात घेता विचार केला तर ही वारी Walking Marathon आहे.दररोज 15 ते 20 किलोमीटर पायी चालल्याने हृदयाची ठोके नियंत्रित राहतात. रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होते. आधुनिक विज्ञान याला Aerobic Exercise म्हणते.वारीमध्ये हे फक्त व्यायामासाठी न होता भक्ती करिता होते म्हणून मनावर ताण येत नाही. चालून वारकरी थकतो, दमतो, वारकऱ्याला आराम करावासा वाटतो, कितीही शरीर थकलं तरी मन मात्र थकत नाही, मन हे उत्साही आनंदी राहत. लाखो लोक या वारीमध्ये विठुरायाचा जयघोष माऊली माऊली चा जयघोष करत एकत्र चालतात,एकत्र झोपतात,एकत्र जेवण करतात किती तो आनंद .वेगवेगळ्या भागातील लोकांच्या संपर्कात आल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या वाढते शिवाय उन्हात मातीला पाय लावून चालने यामुळे Vitamin D & Good Bacteria शरीरात जातात खरंतर हा संसर्ग नाही तर संतांनी आपल्यावर केलेला संस्कार म्हणावा लागेल . 10 ते 15 दिवस मोबाईल नाही, टीव्ही नाही ,कामाचा ताण नाही,फक्त नामस्मरण ,टाळ मृदंगाचा आवाज भजनाचा आवाज आणि निसर्ग या सर्वांच्या सहवासामुळे शरीरातील आनंदाचे हार्मोन वाढते म्हणून वारीवरून आल्यावर आपल्याला संपूर्ण वर्षभर पुरेल एवढी Energy ( ऊर्जा )आपल्याला वारीत मिळते .म्हणून माय बाप हो आपल्याला जेवढे दिवस जमतील तेवढे दिवस आपल्या कामातून वेळ काढून नक्की यावर्षी आपल्या भागामधील कोणत्याही दिंडीमध्ये सामील व्हा आणि पंढरीची वारी करा
'आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुंज पांडुरंग'
सामाजिक विज्ञानाचा विचार करिता (Community Healing ) विज्ञान सांगते एकटेपणात राहण्यापेक्षा सामाजिकत्त्वां मध्ये राहिलेलं फार काही चांगलं .वारीमध्ये माणूस कधीच एकटा नसतो चालताना, जेवताना, झोपताना, सगळे सोबत एकमेकांना पाणी देणे, औषध देणे ,यामुळे कुठल्याही प्रकारचे नैराश्य वारीमध्ये नसते यालाच Collective Care म्हणतात.
वारीमध्ये पर्यावरणाचा विचार करिता प्लास्टिकला बंदी, पानात जेवण, नदीचे पाणी, तुळशीची पूजा,यामुळे शरीरात टॉक्सिन घटक कमी जातात कारण यामध्ये निसर्ग असल्याने Phytoncides नावाचे रसायन आपल्या श्वासा वाटे शरीरात जाते जे कॅन्सर सारख्या पेशींशी लढते हेच तर विज्ञान आपल्याला संतांनी वारीच्या माध्यमातून सोपे करून सांगितले.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती'
विज्ञानाने जे शोधलं ते आपल्या संतांनी खूप आधीच सांगितले त्यामध्ये एक म्हणजे वारी देहाचे आणि आत्म्याचे स्वास्थ्य.
वारी ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारा एक बूस्टर डोस आहे कारण वारीच्या वाटेतील गावे, शेतकरी ,तेथील किराणा दुकानदार ,येथील फळ विक्रेते, तेथील व्यापारी, यामध्ये होणारी आर्थिक उलाढाल याचा विचार केला तर वारी एक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक आहे .वारीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन का महत्त्वाचा कारण आपण आजच्या काळामध्ये सकाळी जॉगिंग करणे,जिम, डायट,मेडिटेशन ,डिजिटल डिटॉक्स ,साठी लाखो रुपये खर्च करतो पण आपले संतांनी हे सगळे एकत्र करून वारी नावाने मोफत पॅकेज शेकडो वर्षांपूर्वी दिले आहे म्हणूनच मला आज वारीचे वैज्ञानिक विश्लेषण करावेसे वाटले. वारीमध्ये जो पोशाख असतो तो म्हणजे पंजा, फेटा किंवा टोपी धोतर ,कुर्ता हे सर्व शुभ्र वस्त्र हा गणवेश वैराग्याचा तसेच तो गणवेश आरोग्याचाही आहे.
म्हणून वर्षातून किमान पाच दिवस का होत नाही पण वारी करा शरीर निरोगी होईल मन शांत होईल आणि आत्मा पावन होईल हेच संतांचे मुख्य उद्दिष्ट.
'ज्ञानोबाराय आपल्या पसायदानात म्हणतात ना जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भुता परस्परे पडो मैत्र जिवांचे '
माय बाप हो ही माऊलीची तळमळ कोणाकरिता आहे आपल्याकरिताच ना.
वारकरी संप्रदायामध्ये वारीला जीवन मुक्तीचा राजमार्ग मानले जाते संतांनी दिलेला समता बंधुभाव मानवता आणि भक्तीचा संदेश या वारीतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो जात धर्म पंथ आणि सामाजिक स्तर यांचे भेद विसरून सर्वजण एकाच नाम घोषात सहभागी होतात त्यामुळे वारी ही सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करणारी चळवळ ठरत आहे.संत साहित्याच्या अभ्यासकांच्या मते पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची सर्वात प्रभावी संस्कृती अभिव्यक्ती आहे. लाखो वारकऱ्यांच्या सहभागातून भक्ती आणि समाज जीवनाच्या अद्वितीय संगम येथे अनुभवता येतो.
"हेचि व्हावी माझी आस ।
जन्मोजन्मी तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी ।
वारी चुकों नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ ।
अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान ।
तुका मागे हेचि दान ॥४॥
या भावनेने प्रेरित झालेले वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पाऊल टाकत असताना संतांनी दाखविलेल्या भक्तीचा मार्ग आजही समाजाला आनंद समता आणि मानवतेचा संदेश देत असल्याचे चित्र या वारीतून दिसून येत आहे.
🚩राम कृष्ण हरी 🚩श्रीविठ्ठल🚩 ज्ञानोबा तुकाराम🚩






stay connected