शिक्षणाच्या वाटेवर ज्ञानदानाचा दीप; उद्योजक आजिनाथ देवकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरांचे वाटप

 शिक्षणाच्या वाटेवर ज्ञानदानाचा दीप; उद्योजक आजिनाथ देवकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरांचे वाटप



आष्टी | प्रतिनिधी


विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवणारा आणि शिक्षणाच्या पवित्र कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड देणारा एक प्रेरणादायी उपक्रम आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे पाहायला मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरापूर येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी शिरापूरचे भूमिपुत्र तथा पुणे येथे कार्यरत यशस्वी उद्योजक आजिनाथ देवकर यांनी इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरांचे वाटप करून शिक्षणप्रेमी वृत्तीचे दर्शन घडविले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच झुंबर चव्हाण हे होते. कार्यक्रमास प्रा. भास्कर चव्हाण, उत्तम देवकर, जालींदर देवकर, तात्यासाहेब देवकर, जावेद शेख, राहुल पगारे, सावन तागड, हरिश्चंद्र काळे, काकासाहेब तागड, विनोद देवकर, उपसरपंच सचिन काळे, मुख्याध्यापक महाडीक सर, कर्डीले सर, भूकन सर, जिवे मॅडम, पोकळे मॅडम, तागड मॅडम, नगरचे सामाजिक कार्यकर्ते बापू शेडाळे, पत्रकार सय्यद बबलूभाई यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजिनाथ देवकर यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली.


विशेष म्हणजे, हा उपक्रम देवकर यांच्यासाठी नवीन नसून गेल्या वर्षीदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप केले होते. शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ आणि गावाप्रती असलेले प्रेम यामुळे त्यांनी केवळ दफ्तरांचे वितरणच केले नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, संगणक शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने शाळेला संगणक संच भेट दिले आहेत. एवढेच नव्हे तर स्वतःच्या खर्चातून संगणक प्रशिक्षकाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचा मार्ग अधिक सुकर केला आहे.


अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत यशाचे शिखर गाठलेल्या आजिनाथ देवकर यांनी आपल्या मूळ गावाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. आपल्या यशातील काही हिस्सा समाजाला परत देण्याची भावना जपत ते सातत्याने शैक्षणिक, सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश निर्माण होत असून ग्रामीण शिक्षणाला बळकटी मिळत आहे.


यावेळी बोलताना देवकर यांनी, "गावातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि भविष्यात समाजासाठी योगदान द्यावे, हीच अपेक्षा आहे. शाळेच्या विकासासाठी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करत राहू," असे सांगितले.


देवकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी मनापासून कौतुक केले. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.


शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, याची जाणीव ठेवून आजिनाथ देवकर यांनी उभारलेला हा ज्ञानदानाचा दीप अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला उजळविणारा ठरणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.