*प्रा. डॉ. शंकर चव्हाण यांच्या 'लागे जगण्या वाळवी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन* ॲड.सुभाष लांडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

 *प्रा. डॉ. शंकर चव्हाण यांच्या 'लागे जगण्या वाळवी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन*
 ॲड.सुभाष लांडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.



शेवगाव (प्रतिनिधी ): "सामाजिक, विधायक दृष्टिकोन ठेवून सर्वांना समान  न्याय मिळावा याचा विचार सातत्याने डोक्यात ठेवून लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.शंकरराव चव्हाण हे खऱ्या अर्थाने समाजाचे प्रेरणास्त्रोत होते." असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ.ॲड सुभाष लांडे पाटील यांनी व्यक्त केले. 

       ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या शुभहस्ते झालेल्या प्रा.डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 'लागे जगण्या वाळवी' या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, प्रा.दादा नन्नावरे, ज्येष्ठ कवी प्रा.चंद्रकांत कर्डक, हुमायून आतार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना लांडे पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक म्हणून काम करत असलेले डॉ. चव्हाण चळवळीतील सर्वांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करत होते. 

प्रा. चंद्रकांत कर्डक म्हणाले की, एका मार्गदर्शकाच्या रूपाने सर भूमिका बजावत होते. त्यांच्या जाण्याने त्यांची कविता ही पोरकी झाली आहे.

प्रा.दादा नन्नावरे म्हणाले की, मार्क्स, फुले,आंबेडकर या प्रागतिक विचारावर आणि लोकशाहीवर प्रगट निष्ठा असलेल्या कवी मनाच प्रतिबिंब त्यांनी आपल्या कवितेतून सातत्याने व्यक्त केल आहे. 

सुनील गोसावी म्हणाले की, शब्दगंध चळवळीच्या सुरुवातीपासूनच डॉ. शंकरराव चव्हाण सर मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते, अनेक नवोदित लेखक कवींना मार्गदर्शन करण्याचे काम ते सातत्याने करत असत. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक लोक सध्या कार्यरत आहेत. ' लागे जगण्या वाळवी ' काव्यसंग्रहात त्यांनी दुःख, दारिद्र्य, आत्मसन्मान आणि मानसिक बदलत्या मूल्यवस्थेचे संदर्भ दिलेले आहेत. 

डॉ.कैलास दौंड बोलताना म्हणाले की, सरांचा पूर्वीचा संघर्ष त्यांनी वेळोवेळी आपल्या मनोगतातून मांडला होता. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले. त्यांची कविता ही हृदयस्पर्शी कविता असून अंतहीन वेदनेची आणि कृषी जन संस्कृतीतील घूसस्मटाची आणि माणसांच्या परस्पर सह संबंधाच्या व्यवहाराची, जगण्याची कल्पकता मांडणारी आहे. यापूर्वीचा कोंडमारा काव्यसंग्रह व आत्ताचा लागे जगण्या वाळवी हे दोन्हीही संग्रह कष्टकरी समाजाप्रती असलेली आत्मीयता ठेवून समाजभान जपणारी कविता त्यांनी लिहिली आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सुरेश घोक्षे सूत्रसंचालन केले. यावेळी सचिन दळवी, विलास खंडागळे, शामराव दळवी, शहादेव निळे, संतोष पटवेकर, डॉ.सुशील कबाडी, बाळासाहेब देशपांडे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ. अमित चव्हाण, श्रीमती सुशीला चव्हाण, डॉ. मृगजा व अतुल पायाळ, सौ.तृष्णा व मंगेश कांबळे, सौ.क्रांती व विशाल उघाडे, प्रा.सलीम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.