रानटी डुकराचा शेतकर्यावर हल्ला; पिंपळा परिसरात भीतीचे वातावरण, शेतकऱ्यांकडून संरक्षणासाठी निधीची मागणी

 रानटी डुकराचा शेतकर्यावर हल्ला; पिंपळा परिसरात भीतीचे वातावरण, शेतकऱ्यांकडून संरक्षणासाठी निधीची मागणी



आष्टी प्रतिनिधी  


पिंपळा (ता. आष्टी, जि. बीड) : पिंपळा येथील शेतकरी भाऊसाहेब नवनाथ पवार (वय 55) यांच्यावर गुरुवारी दि. 18 जून 2026 रोजी मध्यरात्री सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास रानात जात असताना रानटी डुकराने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पवार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर  अहिल्यानगर येथील शेळके हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


घटनेची माहिती परिसरात पसरताच पिंपळा, सय्यदमीर लोणी, सुंबेवाडी, काकडवाडी आणि धनगरवाडी या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रानटी डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शेतात जाण्यासाठीही शेतकरी धास्तावले आहेत.


दरम्यान, परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की, रानटी प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे जीवित धोक्यात आले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे, त्यांना शेताभोवती संरक्षक कंपाऊंड अथवा तार कुंपण उभारण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच, रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भाऊसाहेब नवनाथ पवार यांना वन विभागाने नियमानुसार आर्थिक मदत व आवश्यक सहकार्य करावे, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


या घटनेमुळे आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात रानटी प्राण्यांच्या वाढत्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.