गॅस सिलेंडरची टाकी चे सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळत नाही ? ग्राहकांनी आपले अधिकार जाणून घ्या!
देशातील लाखो नागरिक घरगुती एलपीजी गॅसचा वापर करतात. भारत गॅस, इंडेन आणि एचपी गॅस या कंपन्यांकडून ग्राहकांना गॅस कनेक्शन दिले जाते. नवीन कनेक्शन घेताना ग्राहकांकडून सिलेंडर आणि रेग्युलेटरसाठी सिक्युरिटी डिपॉझिट (अनामत रक्कम) घेतली जाते. ही रक्कम ग्राहकाची मालमत्ता असून गॅस कनेक्शन बंद करताना संबंधित साहित्य परत दिल्यानंतर ग्राहकाला परत मिळणे आवश्यक आहे.
मात्र अनेक ठिकाणी ग्राहकांकडून अशी तक्रार केली जाते की, कनेक्शन बंद केल्यानंतरही गॅस एजन्सीकडून सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम परत दिली जात नाही, विविध कारणे सांगून टाळाटाळ केली जाते किंवा ग्राहकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी आपले कायदेशीर अधिकार जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ग्राहकांचे महत्त्वाचे अधिकार
● गॅस कनेक्शन बंद केल्यानंतर सिलेंडर व रेग्युलेटर परत दिल्यास सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम परत मिळण्याचा अधिकार.
● एजन्सीकडे केलेल्या तक्रारीची पावती किंवा तक्रार क्रमांक मिळण्याचा अधिकार.
● वेळेत व पारदर्शक सेवा मिळण्याचा अधिकार.
● चुकीची माहिती, जादा वसुली किंवा अन्यायकारक वागणुकीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार.
● ग्राहक आयोगाकडे दाद मागण्याचा अधिकार.
ग्राहकांनी काय करावे?
जर गॅस एजन्सी सिक्युरिटी डिपॉझिट परत देत नसेल तर प्रथम एजन्सीकडे लेखी अर्ज द्यावा. अर्जामध्ये ग्राहक क्रमांक, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि कनेक्शन बंद केल्याची माहिती नमूद करावी. अर्जाची प्राप्ती पावती घेणे अत्यंत आवश्यक आहे.
जर एजन्सीकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही तर संबंधित गॅस कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाइन तक्रार नोंदवावी.
तक्रार कोठे करावी?
१) संबंधित भारत गॅस एजन्सीकडे लेखी तक्रार.
२) भारत गॅस ग्राहक सेवा पोर्टलवर ऑनलाइन तक्रार.
३) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या (MoPNG) ई-सेवा पोर्टलवर तक्रार.
४) आवश्यक असल्यास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) यांच्याकडे तक्रार.
५) शेवटचा उपाय म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागता येते.
कागदपत्रे जतन करा
● ग्राहक पुस्तिका / ग्राहक क्रमांक
● सिक्युरिटी डिपॉझिटची पावती (असल्यास)
● कनेक्शन बंद केल्याचा पुरावा
● एजन्सीसोबत झालेला पत्रव्यवहार
● तक्रार क्रमांक व पावत्या
ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी महत्त्वाची ठरतात.
ग्राहकांनी जागरूक राहण्याची गरज
अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती नसल्याने ते आर्थिक नुकसान सहन करतात. गॅस कनेक्शनसाठी भरलेली अनामत रक्कम ही ग्राहकाची हक्काची रक्कम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची टाळाटाळ किंवा अन्याय झाल्यास शांत न बसता संबंधित विभागाकडे तक्रार करावी.
जागरूक ग्राहक हाच सक्षम ग्राहक असतो. आपले हक्क जाणून घ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवा आणि इतरांनाही या बाबत माहिती द्या.
–

stay connected