उपोषणाला भेट दिल्याच्या कारणावरून राजू शेलार यांना जीवे मारण्याची धमकी आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

 उपोषणाला भेट दिल्याच्या कारणावरून राजू शेलार यांना जीवे मारण्याची धमकी
आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल 


आष्टी प्रतिनिधी - तालुक्यातील बाळेवाडी या गावात झालेल्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणाविरोधात आष्टी येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट का दिली या कारणावरून राजू शेलार यांना गावातील ऋषिकेश बोंद्रे यांनी तू 'रस्त्यावर दिसल्यास जीवे मारण्याची धमकी' दिल्याची घटना शनिवार दि. 13 जून रोजी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.



आष्टी येथील पंचायत समिती समोर चार दिवसांपूर्वी बाळेवाडी या गावात  कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषण सुरू होते. या उपोषणाला अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक, पत्रकारांनी भेटी दिलेल्या होत्या. दरम्यान, आपल्या गावातील ग्रामस्थ आष्टी येथे उपोषणाला बसले असल्याने राजू शेलार यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. याचा राग मनात धरून गावातील ऋषिकेश बोंद्रे याने राजू शेलार यांना ' तू कुठे आहेस, असे फोनवर सांगितले असता  राजू शेलार यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोर असल्याचे सांगितले असता ऋषिकेश बोंद्रे हा त्या ठिकाणी येऊन ' तू आष्टी पंचायत समिती समोर सुरू असलेल्या उपोषणाला भेट का दिली'  आमच्या विरोधात हालचाली केल्यास आणि रस्त्यावर दिसलास तर तुला जीवे मारू," अशी धमकी दिल्याचा आरोप राजू शेलार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. या धमकीमुळे संबंधित व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी शनिवारी उशिरा राजू शेलार यांनी आंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक आंदोलनांमध्ये सहभाग आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास आंभोरा पोलीस करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.