हजरत सय्यद मस्तान शाह वली दर्ग्याचा संदल व उरूस उत्साहात संपन्न
अहिल्यानगर : हजरत सय्यद मस्तान शाह वली ट्रस्टच्या वतीने मस्तान शाह चौक, कोटला रोड येथे सालाबादप्रमाणे यंदाही हजरत सय्यद मस्तान शाह वली यांच्या संदल व उरूस शरीफचे आयोजन मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सायंकाळी संदल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हजरत सय्यद मस्तान शाह वली दर्ग्यावरून चादर घेऊन ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक बारा इमाम कोटला येथे पोहोचल्यानंतर सवारीवर चादर अर्पण करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजरत सय्यद मस्तान शाह वली दर्ग्यावर संदल चढवून प्रार्थना केली. देशातील शांतता, बंधुता आणि सर्वधर्म समभावासाठी विशेष दुआ करण्यात आली. संपूर्ण परिसर धार्मिक जयघोषांनी दुमदुमून गेला होता. तसेच आकर्षक आतषबाजी करण्यात आल्याने वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले होते.
त्यानंतर शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी उरूस शरीफनिमित्त भव्य भंडारा व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. या भंडाऱ्याचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. विविध भागांतून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे चेअरमन सय्यद निजामुद्दीन सय्यद इसामुद्दीन जागीरदार, बारा इमाम कोटलाचे चेअरमन सय्यद इलियास इसामुद्दीन जागीरदार, बारा इमाम कोटलाचे ट्रस्टी नासिर खान गणी खान, खजिनदार शेख शब्बीर उस्मान, सचिव सय्यद वसीम निजामुद्दीन जागीरदार, सय्यद सुलतान निजामुद्दीन जागीरदार, शेख शादाब शब्बीर, मौलाना अजगर अली, अॅड. हनीफभाई, सामाजिक कार्यकर्ते सय्यद शाहनवाज निजामुद्दीन जागीरदार, आबासाहेब वामन हुच्चे, नवेद खान, शेख अली, सय्यद मोसिन सय्यद इलियास जागीरदार यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरूस आणि संदल सोहळा शांततापूर्ण, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच या सोहळ्याने समाजात एकता, प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिला..


stay connected