अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप; आष्टी तहसील कार्यालयासमोर पीडित मातेचे आमरण उपोषण
आष्टी (प्रतिनिधी):
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी अंभोरा पोलिसांकडून मुख्य संशयित आरोपीला पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत, गहुखेल येथील पीडित मातेसह कुटुंबियांनी आज, ११ जून रोजी सकाळी आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सोनाली सुभाष आहेरकर असे उपोषणास बसलेल्या आईचे नाव असून, या आंदोलनामुळे आष्टी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गहुखेल येथील रहिवासी असलेल्या सोनाली आहेरकर यांच्या अल्पवयीन मुलीला गत ३० मे २०२६ रोजी मौजे तागडखेल येथील रहिवासी केशव गव्हाणे याचा मुलगा शिवम केशव गव्हाणे याने लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. या घटनेनंतर पीडित मातेने तातडीने अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिवम गव्हाणे याच्याविरोधात लेखी फिर्याद दिली होती. मात्र, अंभोरा पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीचे नाव माहित असूनही जाणीवपूर्वक त्याला गुन्ह्यातून वगळले आणि अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १७२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला, असा आरोप उपोषणकर्त्या महिलेने केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून पीडित कुटुंब दररोज अंभोरा पोलीस ठाण्यात चकरा मारत असून मुलीचा शोध घेण्याची विनंती करत आहे. मात्र, पोलीस कर्मचारी या गंभीर घटनेची दखल घेत नसून संशयित शिवमच्या नातेवाईकांची साधी चौकशी देखील करायला तयार नाहीत. त्यातच, 'जर पोलिसांतील गुन्हा मागे घेतला, तरच तुमची मुलगी तुमच्या ताब्यात परत देऊ', असा निरोप शिवम गव्हाणे याचे कुटुंबीय हस्ते-परहस्ते पीडित कुटुंबाला पाठवून उघड धमकी देत आहेत. या धमकीबाबतही अंभोरा पोलिसांना माहिती देण्यात आली, परंतु पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
मुलीचा शोध लागत नसल्याने आणि पोलिसांच्या अशा ढिसाळ व निष्काळजी कारभारामुळे आहेरकर कुटुंब सध्या तीव्र मानसिक तणावाखाली आहे. अंभोरा पोलिसांकडून आता न्याय मिळण्याची कोणतीही आशा उरली नसल्याने, अखेर हताश होऊन सोनाली आहेरकर यांनी आजपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मुलीचा सुरक्षित शोध लागत नाही आणि दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा पीडित कुटुंबाने घेतला असून, आता प्रशासन यावर काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


stay connected