पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा दहावीचा ९३.९१ टक्के निकाल कु.सायली बबन उकले शंभर टक्के गुणांसह प्रथम

 पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा दहावीचा ९३.९१ टक्के निकाल
कु.सायली बबन उकले शंभर टक्के गुणांसह प्रथम



आष्टी - (प्रतिनिधी) आष्टी येथील पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा यंदाही कायम राखत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९३.९१ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्हाभरात विविध शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय उपक्रमांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या प्रशालेने यावर्षीही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विद्यार्थिनींच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्याने हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

यावर्षी शाळेतील एकूण ११५ विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी तब्बल १०८ विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाल्या असून १७ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. शाळेचा एकूण निकाल ९३.९१ टक्के लागला असून, ग्रामीण भागातील मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये कन्या प्रशालेने पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या परीक्षेमध्ये कु. सायली बबन उकले हिने शंभर टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेसह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कु. सिद्धी किशोर राजूरकर हिने ९८.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. कु. तनुजा राम पोकळे हिने ९७.८० टक्के गुण व कु. अंकिता देविदास तावरे हिनेही ९७.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल १७ विद्यार्थिनींनी शाळेच्या गुणवत्तापूर्ण परंपरेत भर घातली आहे.

आष्टी शहरासह तालुक्यातील विविध गावांतील मुली मोठ्या संख्येने या कन्या प्रशालेत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थिनींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त, स्पर्धात्मक वृत्ती आणि सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शाळेकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षकांचे परिश्रम, नियमित सराव परीक्षा, पालकसभा, विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आणि अभ्यासपूरक उपक्रम यांचा या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल गुणवंत विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम. सुजाता विजयकुमार झगडे, समिती सदस्य लक्ष्मण रेडेकर, डॉ. नदीम शेख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, गटशिक्षणाधिकारी मोहन काकडे, मुख्याध्यापक आबासाहेब खताळ, केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थिनींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशालेने आपला गुणवत्तापूर्ण आलेख कायम राखत आष्टी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.