शॉर्ट सर्किटमुळे केशर आंब्याची बाग जळून खाक आष्टी तालुक्यातील बीड सांगवी/गणगेवाडी येथील घटना; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

 

🔥 शॉर्ट सर्किटमुळे केशर आंब्याची बाग जळून खाक
आष्टी तालुक्यातील बीड सांगवी/गणगेवाडी येथील घटना; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान







आष्टी | प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील बीड सांगवी/गणगेवाडी येथे शेतकरी नामदेव लक्ष्मण मोहरकर यांच्या मालकीची सुमारे १ हेक्टर क्षेत्रातील ( एकूण १०० झाडे ) केशर आंब्याची बाग रविवारी (दि. १० मे) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत पूर्णतः जळून खाक झाली. ऐन फळ काढणीच्या काळातच ही दुर्घटना घडल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मोहरकर यांच्या शेतातील केशर आंब्याची बाग यंदा भरघोस फळांनी बहरून गेली होती. काही दिवसांतच आंब्यांची काढणी होणार असल्याने शेतकरी आनंदात होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. उन्हाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही क्षणांतच आगीने संपूर्ण बागेला वेढा घातला.

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र भर उन्हात भडकलेल्या आगीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. पाहता पाहता संपूर्ण आंब्याची बाग जळून खाक झाली.

या आगीत शेकडो आंब्याची झाडे, फळे तसेच सिंचनासाठीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेमुळे मोहरकर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.