Shaktipeeth Highways नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्गाचा मार्ग बदलला; लांबी व खर्चात मोठी वाढ
राज्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि चर्चेतील नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या आराखड्यात मोठा बदल करण्यात आला असून, नव्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
नव्या आराखड्यानुसार महामार्गाची एकूण लांबी आता सुमारे 856 किलोमीटर इतकी होणार आहे. आधीच्या प्रस्तावित मार्गाच्या तुलनेत तब्बल 54 किमीची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच प्रकल्पाच्या खर्चातही मोठी वाढ झाली असून, तो 80 हजार कोटींवरून थेट 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या वाढीव खर्चाला हिरवा कंदील देण्यात आला.
या बदलामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश. नव्या मार्गानुसार हा महामार्ग साताऱ्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर या धार्मिक स्थळांमधून जाणार आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे 40 किमीचा नवीन पट्टा या महामार्गात जोडण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
या नव्या बदलाचा थेट फायदा सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांना होणार आहे. गोव्याकडे जाणाऱ्या प्रवासाचा वेळ आणि अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असून, प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, हा महामार्ग मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळून हा प्रकल्प भविष्यात राज्यासाठी ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


stay connected