मराठी शाळेची घसरती पटसंख्या व त्यावर उपाय Primery school

 मराठी शाळेची घसरती पटसंख्या व त्यावर उपाय 

         *महाराष्ट्रात मराठी शाळा कमी होतांना दिसत आहेत. त्या शाळेत मुलं मिळणं आज कमी झालेलं दिसत आहे. यांचं कारण आहे, इंग्रजी माध्यमाचं महत्व व शिक्षकांचं वागणं. ज्यातून प्रश्न निर्माण होतो की हे इंग्रजीचं महत्व कोणी वाढवलं? तर त्याचं उत्तर येते, शिक्षकांनीच. त्यांनीच आपली मुलं चांगली घडावीत. म्हणूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळेत नेवून टाकली. मराठी माध्यमात ठेवली नाही.  पुर्वी असं नव्हतंच. पुर्वी शिक्षकांची मुलं ही मराठी माध्यमातून शिकायची. ते ज्या शाळेत शिकत असत. त्याच शाळेत त्यांची मुलं असायची. ज्यातून इतरांनाही वाटायचं की जे शिक्षक आपली मुलं आपल्या शाळेत टाकतात. त्याचं कारण त्या शाळेत शिक्षण चांगलं असेलच? तोच दृष्टीकोन हेरुन अशा शाळेत पटसंख्या वाढायची. परंतु आज तसं नाही. आज तसथ नसल्यानं पटसंख्या साहजीकच कमी होत आहे आणि हाच शिक्षकवर्ग त्यातून इतरांना बदनाम करीत आहे.*
           आज मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत व इंग्रजी शाळेची संख्या वाढत चाललेली आहे. त्यातच मराठी शाळेत मुलं यावी म्हणून पालक उदासीन असले तरी पालकांना पटविण्यासाठी मराठी शाळेतील शिक्षक मंडळी फार त्रास घेत आहेत. भटकंती करीत आहेत. त्यातच आपल्याच वेतनातील पैसे खर्च करुन मुलांच्या नव्हे तर पालकांच्या इच्छा पुर्ण करीत आहेत.  शिवाय काही पालकांचे न ऐकावे असे बोल त्या शाळेतील शिक्षकांना ऐकावे लागत आहे. असे चित्र आहे. मग ते शिक्षक कितीही चांगले शिकवीत असले, कितीही चांगल्या स्वभावाचे असले, तरी त्या गोष्टीला काही अर्थ उरलेला दिसत नाही. काल चांगल्या निकाल देणाऱ्याही मराठी शाळा आज बंद पडण्याच्या रांगेत दिसत आहेत.
         अधिकारी वर्गही अशाच कमी असलेल्या शाळेतील शिक्षकांनाच वेठीस धरत आहेत. तेही त्यांचा पानउतारा करुन जात असल्याचे चित्र दिसत आहेत. त्याचंही कारण आहे की त्यांच्यापासून न होणारा लाभ. ज्या शाळेची पटसंख्या कमी. त्या शाळेची आणि शिक्षकांची अधिकारी वर्गासमोर काहीही इज्जत नाही. 
        पालकांची मराठी शाळेबाबत असलेली उदासिनता. त्यातच इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी असलेल्या त्यांच्या रांगा. आज इंग्रजीचं महत्व विषद करुन सांगत आहेत. शिवाय साहजीकच या वातावरणानं मातृभाषेचं महत्वही कमी करुन टाकले आहे. दर्जा तर अजिबातच शिल्लक ठेवलेला नाही. शिवाय मराठी शाळेला एखादा मुलगा सापडलाच तर त्याला टिकविणं कठीण आहे. शिवाय त्याला नियमीत ठेवणंही कठीण आहे. छडी बंद प्रकारानं शिक्षकांचं महत्व कमी करुन पालकांचं महत्व वाढलेलं आहे. आता छडी बंद तर ठेवाच. शिवाय मुलांना चांगलं शिकवा. हेही अलिकडील काळात आलेल्या शिक्षणातून साकार करायचे आहे. याचा परिणाम हा झालावकी आज पालकवर्ग चढल्यासारखी गोष्ट करतात. काही पालकवर्ग असा आहे की ते आपल्या पाल्यांना चक्कं शाळेतच पाठवीत नाही. मग गैरहजेरी लागली तरी चालेल वा मुलगा शाळाबाह्य झाला तरी चालेल. पालकवर्ग नियमीत मुलांना आजही शाळेत पाठवीत नाहीत. पाठवायला तयार नाहीत. शिवाय त्या विषयावर बोलायलाही तयार नसतात. लिहून द्यायला तयार नसतात. त्यातच त्यावर काही शिक्षकाने म्हटल्यास सरळ नाव काढून नेण्याची धमकी देतात. 
          शाळेत पटसंख्या कमी झाली. ती पटसंख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु एक कारण आहे, ते म्हणजे स्टर्धा. काही पालक जरी जास्त शिकले नसले, अर्थात दहावी बारावी असले तरी  तरी त्यांच्यात जागरुकता आली आहे आणि ती जागरुकता जास्तची आहे. त्याला जबाबदार आहे, पालकांचं अज्ञान. पालकवर्ग नक्कीच दहावी शिकला आहे. परंतु त्याला गवसलेलं स्वतःचं मत दिसत नाही. शिवाय शेजारचा चंद्रावर जातोय ना. मग आपणही जायचं. ही स्पर्धेची कला आज निर्माण झालेली  आहे. ती कला प्रत्येक पालकात आहे व हीच कला अज्ञानी व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. परंतु यात शेजारच्या व्यक्तींमध्ये चंद्रावर जाण्याएवढा दम असतो. तो दम आपल्यात नसतोच. हे पालक ओळखत नाही. त्यातच शेजारी जसा नाचतो. तसेच प्रत्येक पालक नाचायला लागतात. त्यातच आपलेच नाही तर आपल्या पाल्याचे भवितव्य खराब करतात. हेच वारंवार दिसून येत आहे. याच पालकांच्या अज्ञानीपणाचा फायदा काही शिक्षणसंस्था घेतांना दिसत आहेत. त्यांनी तर विद्यार्थ्यी शिकले नाही तरी चालेल, परंतु पैसा कमविता आला पाहिजे. हे धोरण स्विकारलेले आहे. त्यामुळं काल एका वस्तीत एक शाळा होती. आज गल्लोगल्लीत दोन दोन शाळा आहेत. त्यातच मुलांचा जन्मदर कमी असल्यानं आज शाळा जास्त व मुलं कमी असे चित्र स्पष्ट दिसत आहे. शिवाय मातृभाषेच्या शाळेत मुलांचा पहिल्या वर्गात प्रवेश होण्याची मर्यादा ही सहा वर्ष असून इंग्रजी शाळेसाठी ती मर्यादा तीनच वर्ष आहे. अशावेळेस मातृभाषेच्या शाळेत मुलं मिळत नाहीत. सहा वर्षे वयाची मुलं ही चक्कं शिकत असलेलीच दिसतात. ज्यातून मातृभाषेच्या शाळेत मुलं सापडत नाहीत.
         इंग्रजी आणि मराठी. हे आजच्या शिक्षणाचे माध्यम. या माध्यमानुसार शाळा आहेत. परंतु मराठी शाळेत मुलं कमी व इंग्रजी शाळेत मुलं जास्त दिसतात. इंग्रजी शाळेत मुलं दिसण्याचं आणखी एक कारण आहे. ते म्हणजे शिक्षकांचं वागणं. शिक्षकांनी आपली मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत न टाकता इंग्रजी माध्यमांच्या शाळेत टाकलेली असल्यानं त्याबाबतीतील सर्व विचार इतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी केला. मग मराठी शाळेत पटसंख्या कमी होणार नाही तर काय? 
         विशेष सांगायचं म्हणजे आज मराठी शाळेतील मुलांचीही पटसंख्या वाढू शकते. जर प्रत्येक शिक्षकांनी आपली मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत टाकली तर...... शासनानं तसा जी आर काढला तर..... त्याशिवाय नोकरीच देवू केली नाही तर...... त्याचा परिणाम नक्कीच इतरांवर होईल. त्यानंतर फरक पडू शकतो व शेजारची मंडळीही आपली मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत टाकू शकतात व मराठी माध्यमातील मुलांची संख्या आपोआपच वाढू शकते. यात शंका नाही. 
              अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.