शब्दगंध च्या राज्यस्तरीय कविता लेखन स्पर्धेत शुभांगी राऊतमारे व कथालेखन स्पर्धेत सौ.श्रद्धा वझे यांना प्रथम पारितोषिके जाहीर
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य व कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून विविध जिल्ह्यांतील साहित्यिकांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कविता लेखन स्पर्धेत परभणी येथील शुभांगी राऊतमारे व कथालेखन स्पर्धेत कल्याण येथील सौ.श्रद्धा वझे यांना प्रथम पारितोषिके जाहीर करण्यात येत असल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शाहिर भारत गाडेकर व सहसचिव प्रा.डॉ.अनिल गर्जे यांनी दिली.
कविता लेखन स्पर्धेत परभणी येथील शुभांगी राऊतमारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर बीड येथील श्रीराम अजब यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक माखजन (ता. संगमेश्वर) येथील श्रीमती वर्षा पोंक्षे यांना मिळाला असून उत्तेजनार्थ पारितोषिक कोलखेडा (जि. अकोला) येथील तुळशीराम बोबडे व पुणे येथील श्रीपाद टेंबे यांना जाहीर करण्यात आले आहे.
कथालेखन स्पर्धेत कल्याण येथील सौ.श्रद्धा वझे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर देवरुख (ता.संगमेश्वर)येथील शरयू गीते यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.तृतीय क्रमांक अहिल्यानगर येथील सौ.प्रमिला वाघ यांना मिळाला असून उत्तेजनार्थ पारितोषिक अकोला येथील स्वाती पुरी यांना जाहीर करण्यात आले आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली जाधव लॉन्स, कल्याण रोड येथे झालेल्या बैठकीत कवयित्री शर्मिला गोसावी, पत्रकार मकरंद घोडके व कवी राजेंद्र फंड यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.सदर पारितोषिक विजेत्यांचा गौरव २४ मे रोजी होणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात करण्यात येणार असून विजेत्यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, खजिनदार भगवान राऊत, प्रा.डॉ.अशोक कानडे, प्राचार्य डॉ.जी.पी. ढाकणे, सुभाष सोनवणे, राजेंद्र चोभे व मकरंद घोडके यांनी अभिनंदन केले आहे.

stay connected