“जय भीम”च्या जयघोषाने कडा नगरी दुमदुमली; एकोपा, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीचा संदेश

 निळ्या विचारांचा जल्लोष; समतेच्या महामानवाला अभिवादन

-----------------

“जय भीम”च्या जयघोषाने कडा नगरी दुमदुमली; एकोपा, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीचा संदेश



-----------------

राजेंद्र जैन / कडा 

-----------------

निळ्या ध्वजांची उधळण, “जय भीम”च्या घोषणांचा कडकडाट आणि उत्साहाने थिरकणारी तरुणाई.. अशा जल्लोषमय वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कडा शहरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ‘एकच साहेब, बाबासाहेब’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


आष्टी तालुक्यातील कडा येथे दि. १० ते १४ एप्रिल दरम्यान रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

संविधान आणि रमाई- बाबासाहेब यांच्या देखाव्यांनी विशेष आकर्षण ठरले. अनिकेत अविनाश गायकवाड यांच्या नृत्याविष्काराने वातावरण रंगतदार झाले, तर युवा गायक संतोष जोंधळे यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने तरुणाईला मंत्रमुग्ध केले. जितेंद्र दादा आसोले यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थितांना नवा विचार दिला.

मंगळवारी सकाळी भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, तर सायंकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आ. सुरेश धस, डॉ. अजय धोंडे यांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून या मिरवणुकीतच्या आनंदोत्सवात रंग भरला. शहरातील हा उत्सव केवळ जयंती न राहता, समतेचा संदेश, एकतेचा उत्सव आणि सामाजिक जागृतीचा दीप प्रज्वलित करणारा सोहळा ठरला. कडा येथील कर्तव्यदक्ष सपोनि विजय नरवडे, पोउपनि कृष्णा शिंदे आणि त्यांच्या टीमने मिरवणुकी दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता. खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत हा उत्सव संपन्न झाला.

------%-------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.