धाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरीचा डाव फसला
------------------
पहाटेच्या अंधारात घुसलेल्या चोराला केसांना धरून पकडले; ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात
-----------------
राजेंद्र जैन / कडा
-----------------
जामखेड तालुक्यातील आघी गावात पहाटेच्या शांततेला चिरत घडलेल्या चोरीच्या प्रयत्नाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र एका धाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने आणि शौर्याने हा डाव फसला आणि आरोपीला रंगेहात पकडण्यात यश आले.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १९ एप्रिलच्या रात्री फिर्यादींची पत्नी घराच्या पडवीत निवांत झोपल्या होत्या, तर त्यांचे पती घरात होते. काळोखाच्या आड लपून दि. २० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ३:३० वाजता आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे (रा. आघी, ता. जामखेड, जि. आहिल्यानगर) याने घरात शिरकाव केला. त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होत, गळ्याला झालेल्या स्पर्शाने महिलेची झोप चाळवली आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी चोराच्या डोक्याचे केस घट्ट पकडले. भीतीवर मात करत त्यांनी जोरदार आरडाओरडा केला. त्यांच्या धाडसाने गोंधळलेला आरोपी सुटण्याचा प्रयत्न करत असतानाच घरातील सदस्य आजूबाजूचे ग्रामस्थ तत्काळ धावून आले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आरोपीला पळ काढण्याआधीच पकडण्यात आले आणि तत्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे आघी गावात महिलांच्या धैर्याची आणि सजगतेची जोरदार चर्चा रंगली आहे. “संकटाच्या वेळी धैर्यच मोठं शस्त्र ठरतं,” याचा प्रत्यय या घटनेतून आला. आष्टी तालुक्यातही महिलांच्या गळ्यातील धूमस्टाईल दागिने ओरबडण्याच्या घटना यापूर्वी घडल्यात. मात्र आष्टी पोलिसांना अद्याप एकही चैनचोर आढळलेला नाही.
-----%--------


stay connected