लाचेच्या विळख्यात महावितरण; महिला अधिकारी रंगेहाथ जेरबंद
-----------------
१८ हजारांच्या लाचेचा सापळा यशस्वी; वाढत्या भ्रष्टाचाराने नागरिक संतप्त
----------------
राजेंद्र जैन / कडा
---------------
आष्टी येथील महावितरण विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक चेहरा उघडकीस आला असून सहाय्यक अभियंता कोमल अर्जुन शिंदे या महिलेला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने विभागात एकच खळबळ उडाली आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाचे ऑडिट पूर्ण करून निधी मंजूर करण्याच्या बदल्यात तब्बल १८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्या विरोधात होता.
याबाबत एका तक्रारदाराने धाडसाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर काटेकोर नियोजन करत सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारच्या सुमारास, लाच स्वीकारण्याच्या क्षणीच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी झडप घालत शिंदे यांना जेरबंद केले. या धाडसी कारवाईत पोलीस उपाधीक्षक सोपान चितमपल्ले यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी खरसाडे, बीडकर, पुरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सध्या या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या लाचखोरीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, महावितरणमध्ये अनेकदा वेगवेगळ्या कामासाठी पैशाची मागणी होणे हे काही नवीन नाहीये, मात्र महिला अधिकारी पहिल्यांदाच लाच घेताना पकडल्यामुळे नागरिकांना हाय व्होल्टेज शॉक बसला आहे.
------%-------

.jpeg)
stay connected