आष्टी नगरपंचायत नगर अभियंता अथहर बेग पवित्र हज यात्रेसाठी रवाना
आष्टी (प्रतिनिधी)
येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले नगर अभियंता मिर्झा अथहर इनायतुल्ला बेग हे पवित्र हज यात्रेसाठी काल रवाना झाले. सुमारे ४५ दिवसांच्या या यात्रेदरम्यान ते इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र तीर्थस्थळे असलेल्या मक्का आणि मदीना येथे जाऊन धार्मिक विधी पार पाडणार आहेत.
हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाचवा स्तंभ मानली जाते. शारीरिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमाने आयुष्यात किमान एकदा हज करणे आवश्यक मानले जाते. इस्लामी दिनदर्शिकेनुसार जिलहज्ज महिन्यात ही यात्रा पार पडते आणि जगभरातील लाखो मुस्लिम सौदी अरेबिया येथे एकत्र येऊन श्रद्धाभावाने हज करतात.
हज यात्रेमध्ये एहराम धारण करणे, काबा भोवती तवाफ (सात फेऱ्या) मारणे, सफा आणि मरवा टेकड्या दरम्यान सई करणे, अराफात पर्वत येथे प्रार्थना करणे, मुजदलिफा येथे मुक्काम, तसेच जमरात ब्रिज येथे रमी जमारात (प्रतीकात्मक दगड मारणे) यांसारखे विविध धार्मिक विधी पार पाडले जातात. याशिवाय कुर्बानी देणे आणि केस कापणे किंवा मुंडण करणे या विधींचाही समावेश असतो.
हज यात्रेमुळे आत्मशुद्धीची भावना दृढ होते, समानतेचा संदेश मिळतो, तसेच संयम, शिस्त आणि अल्लाहप्रती भक्ती वाढीस लागते, असे मानले जाते. भारतातूनही दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक हज कमिटी ऑफ इंडिया मार्फत हज यात्रेसाठी जातात.
यावेळी नगराध्यक्ष जिया बेग,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,जि.प.सदस्य माऊली जरांगे, भाजपा विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे,नगरसेवक सुरेश वारंगुळे,इर्शान खान, अक्षय धोंडे,भारत मुरकुटे,बाळासाहेब घोडके,ज्ञानदेव राऊत, पत्रकार सचिन रानडे,पत्रकार प्रविण पोकळे,समीर शेख,डॉ.सिद्दीक बेग,इंजि.गहिनीनाथ शिरसाट,लेखापाल जीवन साठे, सोमनाथ साखरे, आदींनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.


stay connected