आ. सुरेश धस यांच्या हस्ते ट्रॅक्टर व कृषी अवजारांचे वितरण
आष्टी (प्रतिनिधी) आ. सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी तहसील कार्यालय, आष्टी येथे खरीप हंगाम २०२६ पूर्व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. आगामी हंगामाच्या अनुषंगाने शेती क्षेत्रातील विविध योजना, आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीदरम्यान कृषी विभागाच्या DBT (Direct Benefit Transfer) पोर्टल अंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदान योजनांमधून ट्रॅक्टर तसेच विविध आधुनिक कृषी अवजारांचे वितरण आ.सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम व उत्पादनक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम ठरला.
तसेच गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाचे हमीपत्र देखील देण्यात आले. या माध्यमातून संकटकाळात कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब, उपविभागीय महसूल अधिकारी श्रीमती कविता जाधव, श्रीमती वसीमा शेख, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, शेळके साहेब, गांगर्डे साहेब, कृषी विस्तार अधिकारी, कृषी सेवा केंद्रांचे विक्रेते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विविध समस्यांवर मते मांडली असून प्रशासनाकडून त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. खरीप हंगाम सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन व कृषी विभाग सज्ज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.



stay connected