पत्रकार प्रदीप मगरे यांचा राज्यस्तरीय सन्मान; निर्भीड पत्रकारितेची दखल घेत ‘शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार’ प्रदान

 पत्रकार प्रदीप मगरे यांचा राज्यस्तरीय सन्मान; निर्भीड पत्रकारितेची दखल घेत ‘शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार’ प्रदान



नांदेड /  प्रतिनीधी : चंद्रकांत वाघमारे 


सत्तेला धडक देणारी निर्भीड पत्रकारिता आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या पत्रकारितेची अखेर राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जोशिसांगवी येथील पत्रकार प्रदीप उत्तम मगरे यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले आहे.

आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) येथील हरिकेश लॉन्स बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

प्रदीप मगरे यांनी अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून आवाज दिला. अन्याय, भ्रष्टाचार आणि स्थानिक पातळीवरील गैरव्यवहार उघडकीस आणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना वारंवार जाब विचारला. त्यांच्या लेखणीने अनेकांना न्याय मिळवून दिला असून, हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.

फक्त पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक चळवळींमध्येही मगरे यांनी आघाडी घेतली आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला असून, त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाला जाग यावी लागली आहे.

या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार निवड समितीचे मुख्य आयोजक राजेंद्र पाटील राऊत, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य प्रतापराव दिघावकर (IPS), अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.



यावेळी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,

“प्रदीप मगरे यांनी पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता ती सामाजिक जबाबदारी म्हणून निभावली आहे. त्यांनी तळागाळातील लोकांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचवून व्यवस्था हलवून सोडली. त्यांच्या या लढाऊ वृत्तीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.”

संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला असला, तरी प्रदीप मगरे यांच्या सन्मानाने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.

दरम्यान, हा मानाचा पुरस्कार जाहीर होताच जोशिसांगवी गावासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून मगरे यांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.