आष्टी तालुक्यातील सालेवडगाव–गणेशवाडी रस्त्यावरील पुलाचे काम रखडले; ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीची मागणी

 

आष्टी तालुक्यातील सालेवडगाव–गणेशवाडी रस्त्यावरील पुलाचे काम रखडले; ग्रामस्थांची प्रशासनाकडे तातडीची मागणी




आष्टी (जि. बीड) – सालेवडगाव ते गणेशवाडी रस्त्यावर नदीवरील मंजूर नळकांडी पुलाचे बांधकाम अद्यापही सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत अॅड. संभाजी दहातोंडे यांनी उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आष्टी यांना निवेदन देत काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सालेवडगाव येथून गणेशवाडीला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या दीड वर्षांपासून या पुलासाठी पाठपुरावा सुरू होता. शासनाकडून या नळकांडी पुलाला मंजुरी मिळाल्यानंतर कामाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ग्रामस्थांच्या उपस्थितीत काम थांबवण्यात आले.

त्यानंतर प्रशासनाने नवीन काम लवकर सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. परंतु सुमारे दीड महिना उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, पुलाच्या ठिकाणी खोदकाम करण्यात आल्यामुळे पावसाळ्यात नदीत पाणी आल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच शेतकऱ्यांना शेती कामासाठी ये-जा करणे कठीण होणार आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित ठेकेदार काम करत नसल्यास त्याच्यावर कारवाई करून नवीन ठेकेदार नेमण्यात यावा आणि शासनाच्या मंजूर निधीनुसार दर्जेदार काम तातडीने सुरू करावे. अन्यथा ग्रामस्थांना पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.