नर्मदा तीरावरील महायोगी दादा गुरु महाराज यांची आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

 नर्मदा तीरावरील महायोगी दादा गुरु महाराज यांची आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

*****************************




************************

आष्टी (प्रतिनिधी) 

मध्यप्रदेशातील पवित्र नर्मदा नदी तीरावर दीर्घकाळ कठोर साधना करणारे संत समर्थ दादा गुरु महाराज यांनी शुक्रवारी आष्टी विधानसभेचे आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी आ.सुरेश धस पत्नी सौ. प्राजक्ताताई धस,युवा नेते सागर धस यांनी त्यांचे सस्नेह व आदरपूर्वक स्वागत केले.

दादा गुरु महाराज हे गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ ‘निराहार’ राहून केवळ नर्मदा जल अथवा वायूवर साधना करत असल्याचे मानले जाते. ते नर्मदा नदी संवर्धन, पदयात्रा, वृक्षारोपण तसेच पर्यावरण जनजागृती यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय असून, त्यांनी आतापर्यंत चार लाख किलोमीटरहून अधिक पायी प्रवास केल्याची नोंद आहे.

भेटीदरम्यान दादा गुरु महाराजांनी आ. सुरेश धस, सौ. प्राजक्ताताई धस, सागर धस व इतर कुटुंबीयांना आशीर्वाद दिले. “ज्यांनी मच्छिंद्रनाथ बाबा यांच्या समाधीचे प्रवेशद्वार केले, त्यांच्या घरात मी प्रवेश केला म्हणजे माझ्याच घरात आलो,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले. तसेच भीमा नदी, अमरजा नदी आणि गोदावरी नदी या केवळ नद्या नसून शक्तिस्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी प्रभू रामचंद्र यांच्या वास्तव्याशी निगडित नदीपात्र कोरडे झाल्याचा उल्लेख करत, भविष्यात भीमा नदीचे पाणी या भागात येऊन सुमारे ७५ ते ८० गावांमध्ये हरित क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या अमोघ वाणीतून समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक मूल्यांच्या जपणुकीचा संदेश देण्यात आला.

या सदिच्छा भेटीमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. यावेळी प्रमुख पदाधिकारी, व्यापारी,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.