ज्येष्ठ संपादक, साहित्यिक उमाजी केळुसकर
यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने हृद्य सन्मान
पनवेल : ज्यांची लेखणी अन्यायावर रोखठोक 'प्रहार' करते आणि ज्यांचे शब्द साहित्याच्या अथांग सागरात 'विश्वभरारी' घेतात, असे शब्दांचे अजातशत्रू साधक ज्येष्ठ संपादक आणि अष्टपैलू साहित्यिक उमाजी म. केळुसकर यांना रायगड प्रेस क्लबचा 'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख आणि 'झी २४ तास'चे संपादक कमलेश सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत, पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झालेल्या या दिमाखदार सोहळ्याने केळुसकर यांच्या ४० वर्षांच्या ध्येयनिष्ठ पत्रकारिता आणि साहित्यसेवेला खऱ्या अर्थाने मानवंदना दिली.
या सोहळ्याप्रसंगी महापौर नितीन पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, नगरसेवक प्रथमेश सोमण, कोकण विभाग सचिव मनोज खांबे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे आणि पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
'दैनिक कृषीवल'मध्ये २५ वर्षे सहसंपादक होते आणि सध्या 'साप्ताहिक कोकणनामा'चे संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. उमाजी केळुसकर यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत साहित्याचा डोंगर उभा केला आहे. त्यांच्या नावावर तब्बल १६ ग्रंथांची साहित्यसंपदा असून, त्यात 'इतिहासा वाक माझ्या पुढे', 'सम्राट', 'कधीतरी' ही नाटके; 'शिकार' (गूढकथा संग्रह), 'अंतर्दृष्टी' (ऐतिहासिक कथा संग्रह), 'गोड पाण्याची विहीर', 'दादाच्या गोष्टी' (भाग १ ते ४), 'धैर्यवान धनंजय', 'आकाशातील तारे', 'गोड गोष्टी' हे बालकथा संग्रह; 'विहिरीतले भूत' (बालकादंबरी), 'खोल खोल पाणी' (रहस्यकथा संग्रह), 'विरह' (काव्यसंग्रह), 'रायगडचे रंगकर्मी' (मुलाखत संग्रह) आणि स्व. प्रभाकर पाटील यांचे चरित्र 'कथा एका कर्तृत्वाची' यांचा समावेश आहे.
केळुसकर यांची वृत्तपत्रीय स्तंभांची (सदरांची) आकडेवारी थक्क करणारी आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांतून ७२०० अग्रलेख लिहिले आणि 'खारावारा' या दैनंदिन सदरात ५६०० लेख, तर 'ठसा' या दैनंदिन सदरात २५१ लेख लिहिले आहेत. त्यासोबतच 'दादाच्या गोष्टी' १०००, 'ठसा' २५१ , 'पुस्तकवेध' २००, 'दादागिरी' १००, 'विश्वभरारी' ५२ , 'भ्रमंती' ५०, 'झाडाझडती' ५०, 'ठसा आणि ठोसा' २० आणि 'गूढयात्रा' १० अशा विविध साप्ताहिक सदरांत विपुल सदर लेखन त्यांनी केले आहे.
केवळ लेखनच नव्हे, तर नभोनाट्य लेखन, रंगभूमीवरील अभिनय आणि २०१८ च्या दुसऱ्या समुद्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशी त्यांची विविधांगी कारकीर्द राहिली आहे. त्यांना आजवर राज्य शासनाचा जिजाऊ पत्रकारिता पुरस्कार, र.वा. दिघे साहित्य पुरस्कार, 'काळ'कर्ते शि.म. पराजंपे पत्रकारिता पुरस्कार आदी शेकडो मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. निळू फुले, बाबा कदम, शिवाजी सावंत, द.मा. मिरासदार, ह.मो. मराठे, दिनकर गांगल, प्रवीण दवणे, वसंत जोशी अशा दिग्गजांच्या कौतुकाची थाप मिळालेल्या केळुसकर यांनी नवोदितांसाठी कायमच मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे.


stay connected