९ वर्षांनंतर निकाल; शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना शिक्षा
आष्टी (बीड) : तालुक्यातील मांडवा येथील २०१६ मधील मारहाणीच्या प्रकरणाचा तब्बल ९ वर्षांनंतर निकाल लागला. न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली. न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग, न्यायालय क्रमांक ३, आष्टी यांनी ३१ मार्च २०२६ रोजी हा निर्णय दिला.
१० सप्टेंबर २०१६ रोजी शेतातील बांधावरून झालेल्या वादातून ही घटना घडली होती. फिर्यादी बबन रोहिदास मुटकुळे यांच्या पत्नी दैवशाला मुटकुळे या गवत कापत असताना आरोपी सचिन विठ्ठल मुटकुळे याने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी घटनास्थळी आल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढविला. सचिन मुटकुळे याने विळ्याने वार करून फिर्यादीच्या कपाळ व नाकावर गंभीर दुखापत केली, तर विठ्ठल भाऊसाहेब मुटकुळे व मंगल विठ्ठल मुटकुळे यांनी काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत फिर्यादीच्या नाकाला फ्रॅक्चर झाले.
या प्रकरणी १९ सप्टेंबर २०१६ रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासानंतर २०१७ मध्ये आरोपपत्र दाखल झाले. प्रकरणात एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी बाजूने अॅड. व्ही. एस. गव्हाळे यांनी युक्तिवाद केला, तर बचाव पक्षातर्फे अॅड. सचिन ढाकेफळकर, अॅड. एस. बी. म्हस्के व अॅड. आर. बी. मुटकुळे यांनी बाजू मांडली.
न्यायालयाने सचिन विठ्ठल मुटकुळे यास कलम ३२५ अंतर्गत ११ महिन्यांची सक्तमजुरी व ५,५०० रुपये दंड ठोठावला. तसेच सचिन, विठ्ठल व मंगल मुटकुळे यांना कलम ३२३ सह ३४ अंतर्गत प्रत्येकी २ महिन्यांची सक्तमजुरी व १,००० रुपये दंड सुनावण्यात आला. आरोपी मालन भाऊसाहेब मुटकुळे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने दंडातून ७ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

stay connected