आष्टीतून उठला हक्कांचा आवाज :
कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
-----------------
कडा/ वार्ताहर
-----------------
हक्कांच्या लढ्यासाठी एकजुटीची ताकद दाखवत आष्टी येथील तहसील कार्यालयातील महसूल तसेच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांनी २१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला असून तहसीलदार वैशाली पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रशासनाच्या दालनात चळवळीची नवी चाहूल लागली आहे.
‘सरकारी- निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य’ यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या संपाला आष्टीतील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या न्याय्य मागण्यांसाठी हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
कर्मचाऱ्यांच्या मते, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करणे, रिक्त पदांची तात्काळ भरती करणे तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक भरतीवरील बंदी उठवणे या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या शासनाने अद्याप प्रलंबित ठेवल्या आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप हा अखेरचा पर्याय स्वीकारावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.
तहसील कार्यालयातील कर्मचारी एकदिलाने या आंदोलनात उतरल्याने स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी नागरिकांची माफी मागत, “हा लढा केवळ आमच्यासाठी नसून भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे,” असा भावनिक सूर व्यक्त केला.
या संपामुळे राज्यभरात प्रशासनावर दबाव वाढण्याची चिन्हे दिसत असून, शासन आणि कर्मचारी यांच्यातील संवादाला आता नवे वळण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आष्टीतून उठलेला हा आवाज राज्यभर दुमदुमणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
------%-------=


stay connected