*लोहा तालुक्यात अतिवृष्टीने हजारो विहिरी गाळाने बुजल्या, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे केवळ 292 विहिरींचाच अहवाल सादर शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप*
लोहा :-चंद्रकांत वाघमारे
तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील निळा, शेलगाव, कारेगाव, दापशेड, मडकी, धानोरा, किरोडा, पोखरी, भोशी, सुनेगाव, रायवाडी, मलकापूर, पार्डी, मस्की सह अनेक गावांमध्ये हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या आहेत. सिंचनाचा मुख्य स्रोत बंद झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
विहिरींबरोबरच मोटारी, उभ्या पिकांचे व सौर ऊर्जा पॅनलचेही मोठे नुकसान झाले आहे. निळा येथील भगवान घनश्याम इंगळे व शोभाबाई भगवान इंगळे यांच्या सौर पॅनलचे संपूर्ण नुकसान झाले असून आर्थिक गणित कोलमडले आहे.
शासन निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे गाळाने बुजलेल्या प्रत्येक विहिरीसाठी शेतकऱ्यांना ₹30,000 पर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. तालुक्यात हजाराच्या वर विहिरींचे पंचनामे झाले असताना, मंडळ अधिकारी, तलाठी व पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रत्यक्षात केवळ 292 विहिरींचाच अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.
प्रशासनाने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने पात्र असूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन उर्वरित सर्व बुजलेल्या विहिरींचे फेर-पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.




stay connected