धानोरा येथील सय्यद अबुजरचा पहिला रोजा पूर्ण Ramjan Mubarak 2026

 धानोरा येथील सय्यद अबुजरचा पहिला रोजा पूर्ण




आष्टी तालुक्यातील धानोरा गावातील आठ वर्षीय सय्यद अबुजर अब्बास  याने पवित्र रमजान महिन्यात आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लहान वयात दाखवलेली त्याची श्रद्धा, संयम आणि जिद्द पाहून परिसरातील नागरिकांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे.

मुस्लिम धर्मात पवित्र रमजान महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास, नमाज, कुरआन पठण आणि विविध इबादतीत स्वतःला झोकून देतात. पहाटे सहरी करून दिवसभर उपवास ठेवणे आणि सायंकाळी इफ्तारने रोजा सोडणे ही या महिन्याची प्रमुख परंपरा आहे. घरातील मोठ्यांना रोजा ठेवताना पाहून अनेक लहान मुलेही त्यांचे अनुकरण करत उपवास करण्याचा प्रयत्न करतात.

धानोरा येथील सय्यद कुटुंबातील आठ वर्षीय अबुजर अब्बास सय्यद याने बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. कडक उन्हाच्या झळा असतानाही अबुजरने पहाटेच्या सहरीपासून ते सायंकाळच्या इफ्तारपर्यंत अन्नाचा कण आणि पाण्याचा थेंबही न घेता पूर्ण श्रद्धा आणि संयमाने हा रोजा पूर्ण केला. इतक्या लहान वयात दाखवलेली त्याची जिद्द आणि धार्मिक निष्ठा पाहून अनेकांनी त्याचे विशेष कौतुक केले.

अबुजरने पहिला रोजा पूर्ण केल्यामुळे सय्यद कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्याचे वडील अब्बास सय्यद तसेच कुटुंबीयांनी त्याचे अभिनंदन करत त्याला आशीर्वाद दिले. याशिवाय नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रमजान महिन्यातील उपवासाचे महत्त्व लहानपणापासूनच मुलांना समजावे आणि त्यांच्या मनात धार्मिक संस्कार रुजावेत, यासाठी असे प्रेरणादायी उदाहरण समाजासाठी महत्त्वाचे असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.