आखाती युद्धाचा फटका; कांदा, द्राक्षे-बेदाणा व्यापारावर परिणाम, सुरेश धस यांची सभागृहात आक्रमक मागणी Iran America Israel war

 आखाती युद्धाचा फटका; कांदा, द्राक्षे-बेदाणा व्यापारावर परिणाम, सुरेश धस यांची सभागृहात आक्रमक मागणी





आष्टी (प्रतिनिधी)सुरेश धस यांनी महाराष्ट्र विधिमंडळ यांच्या अर्थसंकल् पीय अधिवेशन २०२६ दरम्यान आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी निर्यातीवर होत असलेल्या गंभीर परिणामांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात उपस्थित केला. कांदा, द्राक्षे आणि बेदाणा या प्रमुख पिकांच्या निर्यात व्यापारावर मोठा परिणाम होत असून शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.



धस यांनी सांगितले की, आखाती देश हे महाराष्ट्रातील कृषी उत्पादनांचे प्रमुख निर्यात बाजारपेठ असून सध्याच्या परिस्थितीमुळे मालाची निर्यात रखडली आहे. परिणामी बाजारभाव घसरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने तत्काळ बैठक घेणे शक्य नसले तरी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संबंधित मंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून ठोस निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी सभागृहात केली. यावर संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, चीनमार्गे अफगाणिस्तान येथून मोठ्या प्रमाणावर बोगस बेदाणा राज्यात दाखल होत असल्याचा गंभीर मुद्दाही धस यांनी उपस्थित केला. पिंपळगाव बसवंत येथील प्रमुख बाजार समिती तसेच तासगाव परिसरात अशा प्रकारचा माल आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणातील जबाबदारांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

या प्रश्नांमुळे राज्यातील कृषी व व्यापार क्षेत्रातील चिंता वाढली असून सरकारच्या पुढील निर्णयाकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.