आष्टीत रंगली 'विकासा'ची धुलवड; पाण्यासाठी दोन माजी आमदार एकवटले आष्टी, पाटोदा,शिरूरच्या पाणी प्रश्नावर मंथन -- व्यापक जनआंदोलन उभारण्याचा नेत्यांचा इशारा

 आष्टीत रंगली 'विकासा'ची धुलवड; पाण्यासाठी दोन माजी आमदार एकवटले आष्टी, पाटोदा,शिरूरच्या पाणी प्रश्नावर मंथन -- व्यापक जनआंदोलन उभारण्याचा नेत्यांचा इशारा




आष्टी (प्रतिनिधी)


 रंगांचा सण असलेल्या धुलीवंदनाच्या दिवशी आष्टी तालुक्यात मात्र एका वेगळ्याच'विकासाच्या धुलवडी'चा रंग पाहायला मिळाला.मतदार संघातील शाश्वत विकासाचा आणि प्रामुख्याने 'पाणी' या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माजी आ.भीमराव धोंडे आणि माजी आ.बाळासाहेब आजबे या दोन नेत्यांनी एकत्र येत रणशिंग फुंकले आहे.या महत्त्वपूर्ण बैठकीने मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची नांदी दिली असून,तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी याला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे.आष्टी येथील भगवान महाविद्यालयात मंगळवारी दि.३ मार्च रोजी ही विशेष बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक घुमरे (पाटोदा), आष्टी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,माजी जि.प.सदस्य रामराव खेडकर, पराग आप्पासाहेब राख,पाटोदा कृ.उ.बा.समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,हनुमंत थोरवे,आरपी आयचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, माजी सभापती नियामत बेग,माजी सभापती अनिल जायभाये,सतीश मामा झगडे,सरपंच दादा जगताप,माऊली वाघ,सुदाम काका झिंजूरके,हरिभाऊ जंजिरे,संजय विधाते,अंकुश मुंडे,संभाजी जगताप,बजरंग कर्डिले,नानाभाऊ वाडेकर,संजय चंदनशिव,सोपान गाडे,आबासाहेब तावरे,आदिनाथ गवळी,भागवत वारे,बबन सांगळे,बाळासाहेब शेकडे,विकास वनवे,गणेश सांगळे,आदेश निमोनकर,सचिन नालकोल, निलेश सोनवणे,सय्यद शहाबुद्दीन,चंद्रशेखर साके,संजय नालकोल,महारुद्र खेडकर,धोंडीबा सांगळे,सूर्यभान सांगळे, दीपक बोराडे आदी मान्यवर व पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा वनवास कायमचा संपवण्यासाठी पाणी कसे उपलब्ध होईल यावर दोन्ही नेत्यांनी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण मंथन केले. ---------- हार्वेस्टरमुळे बेकारी वाढेल,सिंचन हाच पर्याय --- माजी आ.भीमराव धोंडे ------------ यावेळी बोलताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी भविष्यातील संकटावर बोट ठेवले.ते म्हणाले,बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे.भविष्यात ऊसतोडीसाठी हार्वेस्टरचा वापर वाढल्यास या मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल. मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने आपले तालुके दुष्काळी म्हणून गणले जातात.त्यामुळे येथे सिंचनाच्या सुविधा निर्माण करून पाणी आणणे ही काळाची गरज आहे.यासाठी सर्व मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगतानाच,न भूतो न भविष्यती अशी लोकचळवळ उभारू आणि जनसामान्यांच्या रेट्यामुळे आपला हा विषय अंतिम टप्प्यात यशस्वी करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. -------------- सत्तेत असलो तरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू -- माजी आ.बाळासाहेब आजबे --------------- माजी आ. बाळासाहेब आजबे यांनी या प्रश्नावर तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली.जायकवाडी धरणातून काही भागाला पाणी मिळणे,खुंटेफळ प्रकल्पाचे ४ टीएमसी पाणी आणि सीना प्रकल्पाच्या आवर्तनातून पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे माजी आ.आजबे म्हणाले. प्रशासकीय पातळीवर योग्य पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.सत्तेत असलो तरी जनहिताच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राजकीय समीकरणे बदलणार ? एरवी राजकीय आखाड्यात वेगळ्या भूमिका घेणारे हे दोन बडे नेते मतदारसंघाच्या हितासाठी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या एकाधिकारशाही मोडून काढणाऱ्या ऐतिहासिक निर्णयामुळे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. बैठकीच्या शेवटी दोन्ही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून खऱ्या अर्थाने विकासाचे धुलीवंदन साजरे केले. 

---- शेतकऱ्यांच्या शाश्वत पाणी योजनेवर व्यापक चर्चा! ----------- > आष्टी,पाटोदा,शिरूर हे तालुके सिंचनाच्या बाबतीत अत्यंत मागे आहेत. भविष्यातील यांत्रिकीकरणा मुळे (हार्वेस्टर) ऊसतोड कामगारांसमोर रोजगाराचे मोठे संकट उभे राहू शकते.या पार्श्वभूमीवर,विविध मार्गांनी या दुष्काळी पट्ट्यात पाणी आणणे क्रमप्राप्त आहे.यासाठी लवकरच मंत्रिमंडळाशी चर्चा करून जनहिताच्या या विकास योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार माजी आ.भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे यांनी या बैठकीत व्यक्त केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.