खाकी वर्दीतून मानवतेचा संदेश; रमजान निमित्त सामाजिक एकतेची अनोखी मेजवानी
-----------------
सपोनि मंगेश साळवेंच्या पुढाकारातून हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचा सुंदर आदर्श
----------------
राजेंद्र जैन/ कडा
-----------------
खाकी वर्दी ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक नसून मानवतेची जिवंत जाणीवही आहे, याचा प्रत्यय अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या उपक्रमातून आला. रमजान ईदच्या पवित्र निमित्ताने तालुक्यातील धानोरा येथील जामा मज्जिदीत मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यांनी सामाजिक एकता आणि बंधुत्वाचा समाजाला हृदयस्पर्शी संदेश दिला.
Vdo 👇📽️
आष्टी तालुक्यातील धानोरा आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात गावातील सर्वधर्मीय नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. एकत्र बसून झालेल्या स्नेहभोजनाच्या माध्यमातून हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रदर्शन दिसून आले, तसेच परस्परांतील आपुलकी आणि विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
समाजात काही वेळा खाकी वर्दीची प्रतिमा मलीन करणाऱ्या घटना पोटभरू अधिकाऱ्यांमुळे घडत असल्या तरी सपोनि मंगेश साळवे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या पोलीस ब्रीदवाक्याचा मान राखत समाजात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे कार्य करत आहेत.
अंभोरा पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत असून हिंदू-मुस्लिम बांधवांकडून पोलिसांचे मनापासून स्वागत करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक एकता आणि सलोख्याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
-------%%------
रमजानच्या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर समाजात बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोखा दृढ व्हावा या उद्देशाने अंभोरा पोलिसांकडून मुस्लिम बांधवांसाठी एकता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून परस्पर स्नेह, संवाद आणि विश्वासाची नवी नाळ जुळली. या स्तुत्य पुढाकारामुळे समाजात सौहार्दाचे वातावरण अधिक बळकट होईल. “एकतेतच शक्ती” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.
-सपोनि मंगेश साळवे
अंभोरा पोलीस ठाणे, आष्टी
-------%-----










stay connected