आरोग्याच्या दारी अडथळे; नालीकरणाच्या विलंबामुळे रुग्णांची फरफट ------------------ प्रा.आ. केंद्राचा रस्ता खोदून ठेवला, रुग्णवाहिकेलाही मार्ग नाही

 आरोग्याच्या दारी अडथळे; नालीकरणाच्या विलंबामुळे रुग्णांची फरफट
------------------
प्रा.आ. केंद्राचा रस्ता खोदून ठेवला, रुग्णवाहिकेलाही मार्ग नाही



----------------

राजेंद्र जैन / कडा

---------------

आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महामार्ग अधिकारी, ठेकेदारांच्या मनमानीमुळे कासव गतीने सुरू आहे. त्यातच या महाश्यांनी कडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता नाली दुरुस्तीसाठी आठ दिवसापासून खोदून ठेवल्याने आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या रुग्णांसह रुग्णवाहिकेने सरकारी दवाखान्यात जायचं कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


आष्टी तालुक्यातील नगर -बीड महामार्गावरील साबलखेड ते चिंचपूर हा रस्ता चौपदरीकरणाचे काम महामार्ग अधिकारी, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे मागील साडेतीन वर्षापासून अतिशय संथ गतीने चालू असूनही अद्याप हे काम अर्धवट अवस्थेतच आहे. परिणामी या मार्गावर उडणाऱ्या धुळीमुळे व्यावसायिक आणि नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

याच दरम्यान, कडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता नाली दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना दवाखान्यात न्यायचे कसे, आणि एखादी दुर्दैवी घटना घडलीच तर त्यास जबाबदार कोण, असा गंभीर नागरिक उपस्थित करीत आहेत. या दवाखान्यात जाण्यासाठी कडा-धामणगाव मार्गावरून एकच अरुंद पर्यायी रस्ता उपलब्ध असून तोही केवळ एखाद्या कार किंवा पायी जाण्यासाठीच योग्य आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेलाही दवाखान्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसह ठेकेदारांनी किमान दवाखान्याचा रस्ता तातडीने मोकळा करून रुग्णवाहिकेसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी भावनिक व तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.

-----%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.