सालेवडगाव | पुलाच्या कामात ३५ लाखांचा भ्रष्टाचार? ग्रामस्थांचा संताप, काम तात्काळ थांबवले

 

सालेवडगाव | पुलाच्या कामात ३५ लाखांचा भ्रष्टाचार? ग्रामस्थांचा संताप, काम तात्काळ थांबवले

सालेवडगाव (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील सालेवडगाव ते गणेशवाडी रस्त्यावरील नदीवर उभारण्यात येत असलेल्या नळकांडी पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सुमारे ३५ लाखांच्या या कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला घटनास्थळीच धारेवर धरत काम तात्काळ बंद पाडले.

ग्रामस्थांच्या जागृतीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, वाढता रोष पाहता प्रशासनालाही तातडीने हस्तक्षेप करावा लागला. संबंधित अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने निकृष्ट काम काढून टाकून नव्याने दर्जेदार बांधकाम करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पावसाळ्यात नदीला पाणी आल्याने शाळकरी मुले व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या पुलाला जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे पाहणीदरम्यान स्पष्ट झाले.

तसेच, ३५ लाखांच्या निधीत होणारे काम अवघ्या २ ते ३ लाखांत उरकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.