महसूल सेवा गावपातळीवर; शेतकरी-नागरिकांचे प्रश्न जलद सोडवण्यावर भर-आ. सुरेश धस
-----------------------------
छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाचा आष्टा येथे शुभारंभ
---------------------
आष्टी-ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी तालुक्याच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत,महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न गावपातळीवरच मार्गी लागावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाचा शुभारंभ आष्टी तालुक्यातील आष्टा (ह.ना.) महसूल मंडळात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शनिवार (दि.७) रोजी करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. धस म्हणाले की,या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न मंडळ व तलाठी स्तरावर जलदगतीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. डिजिटल सेवांच्या माध्यमातून ७/१२, ८-अ उतारे, तसेच उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे शक्यतो एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर व गोरगरीबांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेत असून या अभियानामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.या अभियानांतर्गत भोगवटदार वर्ग दोन जमिनींचे वर्ग एकमध्ये रूपांतर, प्रलंबित फेरफार प्रकरणे, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील अर्ज निकाली काढणे, आधार अपडेट, जन्म प्रमाणपत्र देणे, गरोदर मातांसाठी किट वाटप तसेच दिव्यांग प्रमाणपत्र अशा विविध सेवा नागरिकांना स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शेतरस्ते व पानंद रस्त्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, अशा सूचनाही आ. धस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी घोडे, उपविभागीय अधिकारी वसिमा शेख, तहसिलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार पांडूरंग माढेकर, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, बाल विकास प्रकल्प अधिकारी बेलेकर, अमरराजे निंबाळकर, मंडळाधिकारी राजकुमार आचार्य यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी तहसिलदार वैशाली पाटील यांनी उपस्थित नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाची सविस्तर माहिती देत नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

.jpg)
stay connected