संस्कारांचे विद्यापीठ आई- वडिलांनीच उभे करावे : प्रा. गणेश लोळगे ---------------- संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित

 संस्कारांचे विद्यापीठ आई- वडिलांनीच उभे करावे : प्रा. गणेश लोळगे
----------------
संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित



----------------

राजेंद्र जैन / कडा

-----------------

आयुष्यातील मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण करायची असेल, तर आई- वडिलांनीच त्यांना “संस्कारांचे विद्यापीठ” उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. गणेश लोळगे यांनी केले.

कडा येथे भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.


पुढे बोलताना लोळगे म्हणाले की, जीवनातील संघर्ष हेच खरे शिक्षक असून मुलांना त्यातून शिकवणे ही काळाची गरज आहे. आजच्या धावपळीत आपण भूतकाळाचे मोल विसरत चाललो आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “जीवनात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते,” हा सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे त्यांनी सांगितले.

सद्गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार केल्यास आयुष्य सुखी होते, असे उदाहरण देत त्यांनी शब्दांच्या ताकदीवर भर दिला. “शब्दांनी माणसं जिंकता येतात आणि तुटतातही,” म्हणून शब्दांचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करण्याची गरज असून, भगवान महावीरांच्या संयम, सातत्य आणि अहिंसेच्या तत्वांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी आजच्या आभासी दुनियेमुळे संयम कमी होत असल्याचे सांगितले. मुलांना महापुरुषांच्या कथा सांगून संस्कार रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“शंभर विचारांपेक्षा एक आचार श्रेष्ठ,” हा महावीरांचा संदेश देत त्यांनी आपल्या विचारातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

-------%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.