युवा उद्योजक हरिभाऊ लगड यांच्याकडून पिंपरखेड शाळेला संगणक संच भेट
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला मिळाली नवी दिशा
हिवरा / प्रतिनिधी -
आष्टी तालुक्यातील हिवरा गावचे भूमिपुत्र व पुणे येथे स्वतःच्या कर्तृत्वावर उद्योग उभारून नावलौकिक मिळवलेले युवा उद्योजक हरिभाऊ शिवलिंग लगड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संगणक संच व प्रिंटर भेट दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या संगणकीय शिक्षणाला मोठी चालना मिळाली आहे.
आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित युगात शिक्षणामध्ये संगणकाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे आणि ते स्पर्धेच्या युगात मागे पडू नयेत, या उद्देशाने हरिभाऊ लगड यांनी हा आदर्श उपक्रम राबविला. शाळेत संगणक व प्रिंटर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण घेणे आता अधिक सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही हरिभाऊ लगड यांनी या शाळेला प्रिंटर भेट दिला होता. त्यावेळी शाळेला संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिलेला शब्द पाळत त्यांनी संगणक संच शाळेला भेट देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत शिक्षक व ग्रामस्थांनी व्यक्त केले.
पिंपरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संगणक व प्रिंटरची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे येथे उद्योग व्यवसाय करणारे युवा उद्योजक हरिभाऊ लगड यांनी पुढाकार घेत शाळेला संगणक संच व प्रिंटर उपलब्ध करून दिला. शाळेत संगणक आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हरिभाऊ लगड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जावे, स्वतःचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष महादेव चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर शंकर चव्हाण, युवा नेते सागर चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे अध्यक्ष भगवान पालवे, प्रगतीशील शेतकरी कुमार घोडके, विनोद काळे, शाळेचे मुख्याध्यापक असलम शेख सर, पदवीधर शिक्षक अतुल चव्हाण सर व सतीश एकशिंगे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने हरिभाऊ लगड यांचे मनापासून आभार मानले असून त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.



stay connected