Beed Crime news बीडमध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार
एका महिन्यात तीन वेळा ‘विक्री’ आणि जबरदस्तीची लग्ने; चौथ्या लग्नाच्या भीतीने तरुणीचा विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
बीड जिल्ह्यात मानवी तस्करी आणि महिलांवरील अत्याचाराचे अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अवघ्या २१ वर्षांच्या एका विवाहित तरुणीला पैशांच्या हव्यासापोटी केवळ एका महिन्याच्या कालावधीत तीन वेळा वेगवेगळ्या व्यक्तींना विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अमानुष छळाला कंटाळून संबंधित तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सध्या ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिचे लग्न सुमारे दोन वर्षांपूर्वी झाले होते. मात्र वैवाहिक आयुष्यातील त्रासामुळे ती काही काळापासून माहेरी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख पुण्यात राहणाऱ्या महानंदा नावाच्या महिलेशी झाली. या महिलेनं तरुणीला “तुझे दुसरे लग्न लावून देतो” असे आश्वासन देत पुण्यात बोलावले.
परंतु मदतीच्या नावाखाली तिला मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकवण्यात आले. आरोपींनी तिच्या असहायतेचा फायदा घेत तिला जणू एखाद्या वस्तूप्रमाणे विकण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम पुण्यातील अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून सुमारे पाच लाख रुपये घेऊन तरुणीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. मात्र या लग्नाला दहा दिवसही पूर्ण झाले नसताना तिला त्या ठिकाणाहून काढून दुसऱ्या व्यक्तीकडे साडेचार लाख रुपयांत विकण्यात आले.
यानंतर ४ मार्च २०२६ रोजी तुळजापूर येथील एका महिलेच्या मदतीने तिला पुन्हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक गावातील एका व्यक्तीशी लग्न करण्यास भाग पाडण्यात आले. या व्यवहारातूनही आरोपींनी सुमारे साडेचार लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.
इतके सर्व अत्याचार होऊनही आरोपींची पैशांची लालसा संपली नाही. ६ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला पुन्हा फोन करून चौथ्या लग्नासाठी तयार राहण्याची धमकी दिल्याचे सांगितले जाते. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच भविष्यातील अनिश्चित आयुष्याची भीती यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आष्टी पोलिसांनी महानंदा, तिचा पती तसेच तुळजापूर येथील दोन मध्यस्थ अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या मानवी तस्करी व फसवणुकीशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, या मागे मोठे आंतरजिल्हा मानवी तस्करीचे जाळे सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे.


stay connected