सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर प्रश्नचिन्ह; मंत्री उत्तर द्यावे – दिपकभाई केदार
मुंबई / प्रतिनिधी :
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांसाठी असलेला निधी योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा गंभीर आरोप करत ऑल इंडिया पँथर सेनेचे प्रमुख दिपकभाई केदार यांनी राज्य सरकारला थेट सवाल केला आहे.
केदार यांनी म्हटले आहे की, बौद्ध आणि दलित समाजाच्या विकासासाठी असलेला निधी योग्य ठिकाणी वापरला जात नसून तो इतरत्र वळवला जात असल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे. “सामाजिक न्याय विभागाचा निधी कंदुरीसारखा वाटला जात आहे का?” असा तीव्र प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार दलित वस्ती सुधार योजनेचा निधी अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने खर्च झालेला दिसत नाही. तसेच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये पीडितांना देण्यात येणारी आर्थिक मदत वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारीही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
केदार यांनी पुढे असेही नमूद केले की, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा आणि तरुणांना आर्थिक मदतीच्या योजना कागदावरच राहिल्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा नेमका वापर कुठे आणि कसा होतो याची पारदर्शक माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांनी या सर्व आरोपांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, तसेच योजनांचा निधी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय का याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणीही केदार यांनी केली आहे.


stay connected