नृत्यांगनेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अखेर जेरबंद; जामखेड पोलिसांची धडक कारवाई
जामखेड प्रतिनिधी
“तु माझ्याशी फोनवर बोलत का नाहीस? माझा नंबर ब्लॉक का केला?” या कारणावरून संतापलेल्या राहुल अशोक कचरे याने एका नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरात घडली होती. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली होती. अखेर तब्बल १२ दिवस फरार असलेल्या आरोपीला जामखेड पोलिसांनी अटक करून मोठे यश मिळवले आहे.
फोनवर धमकी, नंतर थेट हल्ला
गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी राहुल कचरे याने फिर्यादी महिलेला फोन करून,
“माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू बोलली नाहीस तर तुला मारून टाकीन,” अशी धमकी दिली.
महिलेने फोन कट केल्यानंतर आरोपीचा राग अधिकच वाढला.
रूममध्ये घुसून कोयत्याने वार
शुक्रवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी गायत्री तुषार सावंत (वय २६, व्यवसाय – नृत्यांगना) या आपल्या मैत्रिणीसोबत रूममध्ये असताना आरोपीने अचानक प्रवेश करून कोयत्याने बोटे, हात व डोक्यावर वार केले. गंभीर जखमी करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहितीच्या आधारे भूम येथे अटक
आरोपी गेल्या १० ते १२ दिवसांपासून फरार होता. दरम्यान, दि. १४ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी धाराशिव जिल्ह्यातील भूम बसस्थानकावर येणार आहे.
त्यानुसार गुन्हे शोध पथकातील
पो.कॉ. देविदास पळसे,
पो.कॉ. कुलदीप घोळवे,
पो.कॉ. आकाश शेवाळे
यांनी तातडीने कारवाई करत भूम पोलीसांच्या मदतीने बसस्थानक परिसरात सापळा रचला.
झाडाखाली लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या धडक कारवाईत भूम पोलीस स्टेशनचे पो.ना. संदेश क्षिरसागर, तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे व राहुल गुंड यांनीही सहभाग घेतला.


stay connected