दौलावडगांव येथे ‘उमेद’ अंतर्गत कर्ज मंजुरी व वितरणाचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न
महिलांचा अभूतपूर्व सहभाग ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी – खा. बजरंग सोनवने
दौलावडगांव ( राजु गायकवाड / शेख राजू ), प्रतिनिधी :
शिवजयंतीच्या पावन पर्वावर दौलावडगांव येथे ‘उमेद’ (दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान) अंतर्गत कर्ज मंजुरी व वितरणाचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमास खासदार बजरंग सोनवने प्रमुख उपस्थित होते.
या मेळाव्यास आष्टी तालुक्यातील विविध स्वयं सहाय्यता समूहांच्या माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महिलांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सहभाग हे या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले. ग्रामीण विकासासाठी महिलांनी दाखवलेला हा सहभाग सकारात्मक आणि प्रेरणादायी संकेत असल्याचे खासदार सोनवने यांनी यावेळी सांगितले.
खा. सोनवने म्हणाले की, शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या प्रेरणेची आणि स्त्री सन्मानाच्या आदर्शांची आठवण होते. शिवरायांच्या विचारांप्रमाणे समाजातील प्रत्येक घटक सक्षम झाला तरच राष्ट्र बलवान होते आणि महिला सक्षमीकरण हीच त्या महान विचारांची खरी अंमलबजावणी असल्याची जाणीव या कार्यक्रमातून प्रकर्षाने झाली.
आज वितरित करण्यात आलेले कर्ज हे केवळ आर्थिक सहाय्य नसून महिलांच्या स्वप्नांना उंच भरारी देणारे बळ आहे. या माध्यमातून अनेक महिला उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करून स्वतःचे तसेच कुटुंबाचे भविष्य सक्षम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास, कष्टाची तयारी आणि प्रगतीची जिद्द पाहून मनापासून समाधान वाटल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बीड, पंचायत समिती आष्टी तसेच सहभागी सर्व बँकांचे अधिकारी-कर्मचारी आणि परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक घटकाचे खासदार सोनवने यांनी अभिनंदन व आभार मानले.
कार्यक्रमादरम्यान लाभार्थींना त्यांच्या अडचणी व तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली, ही बाब विशेष समाधानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेवटी सर्व लाभार्थींनी या संधीचा योग्य उपयोग करून स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करावा आणि समाजासाठी प्रेरणास्थान बनावे अशी अपेक्षा खासदार बजरंग सोनवने यांनी व्यक्त केली.






stay connected