कडा येथे सोमवारपासुन महाशिवरात्र महोत्सवास प्रारंभ
बबन महाराज बहिरवाल यांची रंगणार श्रीराम कथा
आष्टी: प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील महेशनगर येथे श्री महेश मंदिर ट्रस्टच्या वतीने १२ व्या महाशिवरात्री महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ९ फेब्रुवारी ते सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा भक्तिमय सोहळा पार पडणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल (अध्यक्ष, मदन महाराज संस्थान व सेवाश्रम) यांच्या रसाळ वाणीतून दररोज रात्री ६ ते ९ या वेळेत रंगणारी 'श्रीराम कथा' हे आहे. या कथेसाठी ह.भ.प. धनंजय महाराज कदम, ह.भ.प. अनिकेत महाराज चांगुणे, ह.भ.प. कृष्णा महाराज खांडगे आणि ह.भ.प. हंसराज महाराज मगर हे कलाकार साथसंगत करणार आहेत.
सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ८ ते ९ विष्णू सहस्त्रनाम आणि ९:३० ते १ या वेळेत श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण पार पडेल. तसेच दुपारी २:३० ते ५ श्री संत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ९ ते पहाटे ४ या वेळेत जागर असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवाची सांगता सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महेश गणेश मंडळ, जय हनुमान गणेश मंडळ, श्रीकृष्ण गणेश मंडळ, जय मल्हार गणेश मंडळ, सावता गणेश मंडळ आणि समस्त कडा ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री महेश मंदिर ट्रस्ट व आयोजकांनी केले आहे.

stay connected