ॲड.बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात उद्या भव्य रोजगार मेळावा

 *ॲड.बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात उद्या भव्य रोजगार मेळावा* 

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर नाना हंबर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली  ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टी यांच्या वतीने उद्या दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील युवक-युवतींना औद्योगिक क्षेत्राशी थेट जोडून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.

या रोजगार मेळाव्यात देशातील नामांकित औद्योगिक व बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, त्यामध्ये फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा. लि. (रांजणगाव), जॅबिल सर्किट इंडिया प्रा. लि., एपिटोम कॉम्पोनन्ट्स प्रा. लि. तसेच हायर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. यांचा समावेश आहे. संबंधित कंपन्यांच्या वतीने श्री. विशाल सी. उबाळे, धनश्री मॅडम, श्री. तुषार निंबाळकर आणि श्री. आफ्रोज खान हे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेणार आहेत.

या रोजगार मेळाव्यात आयटीआय, डिप्लोमा, पदवी (UG) बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी, बी. बी.‌ए, बी. सी.ए., बी.एस्सी. संगणक शास्त्र, पदव्युत्तर (PG) तसेच बी.ई./बी.टेक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, सुमारे २५०० रिक्त पदांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना रु. १४,००० ते रु. ४०,००० पर्यंत वेतन दिले जाणार असून, त्याचबरोबर वाहतूक (बस) व कॅन्टीन अशा सुविधा देखील कंपन्यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी दिली आहे. तसेच पात्र उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा (रेझ्युमे) व ओळखपत्रासह वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य डॉ. अविनाश कंदले, नॅक समन्वयक निवृत्ती नानवटे, विद्यार्थी संसदेचे सर्व पदाधिकारी, करिअर काउन्सेलिंग सेलचे सर्व पदाधिकारी, करिअर कट्ट्याचे समन्वयक डॉ. रमेश भारूडकर, प्रा. रवी सातभाई हे सर्वजण नियोजन, समन्वय व व्यवस्थापनाच्या पातळीवर विशेष परिश्रम घेत आहेत.

ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देणारा हा रोजगार मेळावा युवकांच्या करिअरला दिशा देणारा ठरणार असून, शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्याची महाविद्यालयाची सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी या माध्यमातून ठळकपणे अधोरेखित होत आहे. त्यामुळे परिसरातील अधिकाधिक युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.