Darpan Din दर्पण दिन : आज आरसा दाखवण्याचा नाही, आरसा फोडण्याचा दिवस Balshashtri Jambhekar
दर्पण अजूनही सत्य दाखवत आहे का, की सत्तेचा मेकअप सुधारत आहे?
६ जानेवारी. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन. आधुनिक मराठी पत्रकारितेचा पाया ज्यांनी रचला, त्या जांभेकरांच्या नावाने आज दर्पण दिन साजरा केला जातो. पण आजचा दिवस साजरा करताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर उभा राहतो—आजची पत्रकारिता खरंच दर्पण आहे का, की सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर पावडर फासणारा आरसा बनली आहे?
बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले ‘दर्पण’ हे केवळ वृत्तपत्र नव्हते, ते समाजाला सत्य दाखवणारे हत्यार होते. अंधश्रद्धा, अन्याय, सत्तेचा माज यावर निर्भीडपणे प्रहार करणारी ती पत्रकारिता होती. सत्ता दुखावली तरी चालेल, पण सत्य लिहिणे थांबणार नाही, ही त्यांची भूमिका होती. आज मात्र चित्र उलटे झाले आहे. सत्य दुखावू नये म्हणून तेच गळा घोटले जात आहे.
आजची मोठी पत्रकारिता पाहिली तर असे वाटते की चौथा स्तंभ नाहीसा होऊन त्याजागी सत्तेचा विस्तारच उभा राहिला आहे. बातमी आणि जाहिरात यातील सीमारेषा पुसली गेली आहे. सरकारची प्रेसनोट म्हणजे बातमी, नेत्याचा फोटो म्हणजे यशोगाथा आणि प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह, अशी धोकादायक समजूत पसरवली जात आहे. पत्रकारिता जनतेसाठी नसून सत्तेसाठी चालते आहे, ही वस्तुस्थिती आता लपवूनही लपवत नाही.
पेड पत्रकारिता हा आजचा सर्वात मोठा रोग आहे. हा केवळ नैतिक अधःपतनाचा प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या मुळावर घाव आहे. जेव्हा गुन्हेगारांचे उदात्तीकरण केले जाते, भ्रष्टाचाराला विकासाचे नाव दिले जाते, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आकड्यांमध्ये गाडल्या जातात आणि बेरोजगारी अफवा ठरवली जाते, तेव्हा माध्यमे फक्त मौन पाळत नाहीत, तर गुन्ह्यात सहभागी होतात. सत्य लपवणे हेही एक गुन्हाच आहे आणि तो गुन्हा आज उघडपणे, निर्लज्जपणे केला जात आहे.
आज जर बाळशास्त्री जांभेकर जिवंत असते, तर त्यांनी परकीय सत्तेपेक्षा आधी आजच्या विकाऊ पत्रकारितेवर प्रहार केला असता. कारण ब्रिटिश सत्ता बाहेरची होती, पण आजचा धोका आतून आहे. आज लेखणीच गद्दार बनली आहे. सत्याच्या बाजूने उभी राहण्याऐवजी ती सत्तेच्या चरणी लोटांगण घालत आहे.
दर्पण दिन म्हणजे आत्मप्रशंसेचा सोहळा नव्हे. हार घालून, शुभेच्छा देऊन, पुरस्कार वाटून पत्रकारितेचे पाप धुतले जात नाही. हा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. आपण जनतेला आरसा दाखवतो आहोत की जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतो आहोत, हा प्रश्न प्रत्येक माध्यमसंस्थेने स्वतःला विचारायला हवा.
तरीही सगळे चित्र काळोखाचे नाही. आजही काही पत्रकार आहेत, जे धमक्या, खटले, आर्थिक अडचणी झेलूनही सत्य लिहित आहेत. गावखेड्यातील, छोट्या पोर्टल्सवरील, कमी साधनांतील हेच पत्रकार आज दर्पणकारांचे खरे वारसदार आहेत. त्यांच्या खांद्यावरच पत्रकारितेची शेवटची आशा टिकून आहे.
समाज घडवायचा सोडून समाज फोडणारी पत्रकारिता
पत्रकारितेचा मूलभूत उद्देश समाजाला सशक्त, सजग आणि विचारक्षम बनवण्याचा असतो. सत्य सांगणे, प्रश्न विचारणे, सत्तेला जाब विचारणे आणि जनतेला जागृत ठेवणे हीच पत्रकारितेची खरी ओळख आहे. मात्र आज दुर्दैवाने या उद्देशालाच हरताळ फासला जात असून, समाज जोडण्याऐवजी समाज फोडण्याचे काम अनेक माध्यमांकडून उघडपणे केले जात आहे.
आजची बरीचशी पत्रकारिता जनतेला विचार करायला लावत नाही, तर ठरवून दिलेले विचार गिळायला भाग पाडते. प्रश्न निर्माण करण्याऐवजी भीती निर्माण केली जाते. विवेक जागा करण्याऐवजी भावनांना भडकवले जाते. जनतेला नागरिक म्हणून घडवण्याऐवजी मानसिक गुलाम बनवून सत्तेच्या दावणीला बांधण्याचे काम माध्यमांतूनच केले जात आहे. हे सगळे घडत असताना त्याकडे हेतूपुरस्सरपणे दुर्लक्ष केले जाते, हे अधिक धोकादायक आहे.
विशेषतः हिंदू–मुस्लिम द्वेष पसरवण्यात पत्रकारितेचा वापर ज्या पद्धतीने केला जात आहे, ती बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. प्रत्येक घटनेला धार्मिक रंग देणे, गुन्हे धर्माच्या चष्म्यातून पाहणे, एका समाजाला कायम संशयाच्या पिंजऱ्यात उभे करणे आणि दुसऱ्या समाजाच्या भावनांना चिथावणे—हे पत्रकारितेचे काम नाही, तर समाजात विष पेरण्याचे षड्यंत्र आहे. द्वेष विकला जातो कारण तो टीआरपी वाढवतो, क्लिक मिळवतो आणि सत्तेला सोयीचा ठरतो.
आज माध्यमे आरसा दाखवत नाहीत, तर निवडक प्रतिमा दाखवतात. सत्य संपूर्ण सांगितले जात नाही, तर आवश्यक तेवढेच सांगून उरलेले लपवले जाते. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शिक्षण, आरोग्य यांसारखे ज्वलंत प्रश्न बाजूला ठेवून समाजाला भावनिक मुद्द्यांत अडकवून ठेवले जाते. जनता विचार करू लागली तर सत्तेला प्रश्न विचारले जातील, ही भीतीच या पत्रकारितेमागे दडलेली आहे.
पत्रकारिता जर सत्तेची भाषा बोलू लागली, तर लोकशाही मुकी होते. माध्यमे जर द्वेषाची हत्यारे बनली, तर समाज आंधळा होतो. आणि समाज आंधळा झाला की तो सहज गुलाम बनतो. आज हेच घडताना दिसत आहे. जनतेला माहिती दिली जात नाही, तर दिशा दिली जाते; आणि ती दिशा नेहमीच सत्तेच्या सोयीची असते.
हे चित्र सगळीकडे सारखे नाही, हे मान्य करायलाच हवे. अजूनही काही माध्यमे, काही पत्रकार सत्याच्या बाजूने उभे आहेत. ते कमी आहेत, दबावाखाली आहेत, पण तरीही तेच पत्रकारितेचे खरे अस्तित्व टिकवून आहेत. मात्र त्यांचा आवाज दाबला जातो, बदनाम केला जातो, कारण त्यांचे प्रश्न अस्वस्थ करणारे असतात.
आज गरज आहे ती पत्रकारितेने आत्मपरीक्षण करण्याची. आपण समाज घडवत आहोत की समाज उद्ध्वस्त करत आहोत, हा प्रश्न प्रत्येक संपादकाने, प्रत्येक पत्रकाराने स्वतःला विचारायला हवा. धर्म, जात, द्वेष यांचे इंधन बनून पत्रकारिता चालू राहिली, तर उद्या या समाजाला पेटवणारी आग कुणाच्याच नियंत्रणात राहणार नाही.
पत्रकारिता ही समाजाची शान आहे, ती समाजाची शस्त्र नाही. ती सत्याची बाजू घेण्यासाठी असते, द्वेषाची बाजू घेण्यासाठी नव्हे. सशक्त समाज हवा असेल, तर सजग पत्रकारिता हवी. अन्यथा इतिहास हे नोंदवेल की लोकशाहीच्या ऱ्हासात माध्यमे केवळ साक्षीदार नव्हती, तर सहभागी होती.
आजचा दर्पण दिन हा शुभेच्छांचा नाही, तर धिक्काराचा दिवस असायला हवा. आरशात दिसणारा विकृत चेहरा बदलला नाही, तर जनता माध्यमांवरचा विश्वास गमावेल आणि तो दिवस माध्यमांसाठी मृत्युदिन ठरेल. लोकशाहीत माध्यमे जर खोटी ठरली, तर लोकशाहीही फार काळ टिकत नाही.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा एकच शिकवण देतो—पत्रकारिता ही धंदा नाही, ती जबाबदारी आहे. आज त्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा दर्पण दिन इतिहासात साजरा होईल, पण दर्पण मात्र कायमचा तुटलेला राहील.
धानोरा येथील जनता महाविद्यालय येथे दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना प्राचार्य शिवाजीराव ढोबळे , उपप्राचार्य तिपुळे, संपादक बबलुभाई सय्यद , वृत्तपत्र विक्रेते सय्यद आदमभाई सह शिक्षकवृंद



stay connected