*कोल्हापूर नगरीत... रंगला.. कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम
अहिल्यानगर :- कवी सरकार उर्फ विलास पाटील आयोजित 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर येथे करवीर वाचन मंदिर मध्ये संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक गोविंद त्रिंबकराव लहाने हे होते. प्रमुख पाहुण्या सिने, मालिका अभिनेत्री जीविका सोनार , तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अमरनाथ कांबळे हे होते. साहित्यिक पुस्तकांचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिक राजेंद्र फंड यांच्या शुभहस्ते झाले.
या ग्रामीण साहित्य संमेलनात अहिल्यानगरचे कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांचे बहारदार कथाकथन संपन्न झाले. त्यांनी यावेळी आजोबा आणि नातवंडे यांच्या संवादावरील कथा सादर केली. आजच्या या वेगवान युगात माणसा माणसांमधील संवाद हरवत चालला आहे. सारे जण मोबाईल, इंटरनेटच्या मोह जगात अडकले आहेत. एक संवाद मात्र खऱ्या अर्थानं होत आहे, तो म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंडे यांच्यामधील. आजी आजोबा आपल्या संस्काराची, जडणघडणीची, रितीरिवाजाची, सारी शिदोरी नातवंडांना देत राहतात. आजची लहान मुले अतिशय हुशार, चाणाक्ष, लक्षवेधी बुद्धिमत्तेची आहेत.
त्यांच्या चौकस, जिज्ञासू वृत्तीतून, अनेक अद्भुत शंका ते विचारत राहतात. आजी आजोबांची त्रेधातिरपिट होत राहते. आजोबा कौशल्याने शंका निरसन करत राहतात. नातवंडांच्या सहवासात आपले दुःख, वेदना, वाढते वय, सारे काही ते विसरत राहतात. आजी आजोबांची जागा, वृद्धाश्रमात न पाठवता, कुटूंबातच राहयला हवी. हा शुभ संदेश कथेतून छान पैकी दिला गेला.. करवीर वाचन मंदिरात टाळ्यांचा वर्षाव गुंजत राहिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कवी सरकार श्री विलास पाटील यांनी केले.



stay connected