वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

 वेळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात




वेळापूर :

येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. युन्नूस तांबोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायनाने संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी म्हणाले की, भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. भारत हा विविधतेत एकता जपणारा देश असून स्वातंत्र्य, समानता व न्याय या मूल्यांवर आपले संविधान आधारित आहे. या मूल्यांची जपणूक करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करून जबाबदार नागरिक व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक श्री. नितीन चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रवीणकुमार पांगे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. जीवन रणनवरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत सुयोग्य नियोजनात पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक पांडुरंग कुलकर्णी, श्रीमती आसराबाई जैन, श्रीमती किरण घाडगे, सौ. कविता आवटे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व शिक्षण प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संविधान मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.