लोकशाहीचा कणा म्हणजे मतदान; प्रत्येक मत अमूल्य - जिल्हाधिकारी मा.विवेक जॉन्सन
दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती आवश्यक – जिल्हा राजदूत राजेंद्र लाड
आष्टी - (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी १६ वा राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “माझा भारत… माझं मत… मी भारत आहे” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम सौ. के. एस. के. महाविद्यालय, बीड येथील सभागृहात सकाळी ११.३० वाजता संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. विवेक जॉन्सन साहेब (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड) हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्रीम. कविता जाधव मॅडम (उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीड), मा. श्री. शैलेश सूर्यवंशी साहेब (उपजिल्हाधिकारी, बीड), मा. श्री. चंद्रकांत शेळके (तहसीलदार, बीड) तसेच राजेंद्र लाड (दिव्यांग मतदार नोंदणी – बीड जिल्हा राजदूत) यांचा समावेश होता. यावेळी सुरेंद्र डोके (नायब तहसीलदार, निवडणूक), उपप्राचार्य श्रीम. अनिता शिंदे मॅडम, श्रीम. नर्मदा उगलमुगले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन साहेब म्हणाले की, “लोकशाहीचा कणा म्हणजे मतदान असून प्रत्येक नागरिकाने आपला हक्क बजावला पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराचे मत अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने जागृत व सजग राहून मतदान करावे.” १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाने मतदार नोंदणी करून मतदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदान न केल्यास योग्य नेतृत्व निवडण्याची संधी आपणच गमावतो, असे स्पष्ट करत युवकांनी स्वतः मतदान करून इतरांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा वापरून निर्भयपणे मतदान करावे, असे सांगत स्वच्छ, निर्भय व निष्पक्ष मतदानातूनच सशक्त लोकशाही घडते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी दिव्यांग मतदार नोंदणी विभागाचे बीड जिल्हा राजदूत राजेंद्र लाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “दिव्यांग व्यक्तीही लोकशाहीचा समान भाग असून त्यांचा मतदानाचा हक्क तितकाच महत्त्वाचा आहे.” दिव्यांग मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन करत त्यांनी निवडणूक आयोगामार्फत दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, सहाय्यक, ब्रेल ईव्हीएम, प्राधान्य मतदान अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती दिली. मतदान प्रक्रियेत दिव्यांग मतदारांना सन्मान, सुलभता व गोपनीयता मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कुटुंबीय व प्रशासनाने दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करत दिव्यांग मतदारांच्या सक्रिय सहभागातून समावेशक व बळकट लोकशाही निर्माण होते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती वाढवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
१६ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून लोकसभा, विधानसभा तसेच पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी व मतदार यादी तयार करण्याच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुरेंद्र डोके (नायब तहसीलदार, निवडणूक तहसील कार्यालय बीड), श्रीम. नर्मदा उगलमुगले मॅडम (नायब तहसीलदार), सचिन गायकवाड, विश्वजित लांडगे, रविंद्र कुलकर्णी, श्रीम. प्रेरणा लांडगे, सचिन कुलकर्णी, कैलास सुतार, रवि पांगरे यांच्यासह जिल्हा व तालुका निवडणूक विभागातील अधिकारी, कर्मचारी, केंद्रस्तरीय अधिकारी व सेवकांचा मा. जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी मा. श्री. शैलेश सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचा इतिहास व महत्त्व यावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास सुतार यांनी केले, तर आभार प्रदर्शन तहसीलदार मा. श्री. चंद्रकांत शेळके यांनी केले. याप्रसंगी प्रा. गणेश कदम यांनी सर्व उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ दिली.
या कार्यक्रमास नव मतदार, एनसीसीचे विद्यार्थी, जिल्हा व तालुका निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचारी, केंद्रस्तरीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक तसेच सौ. के. एस. के. महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून मतदानाबाबत जागृती होऊन लोकशाही अधिक सक्षम होण्याचा संदेश देण्यात आला.


stay connected