पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचा सन्मान
कडा गावाचे सुपुत्र रवींद्र जाधव दिग्दर्शित ‘जीव’ चित्रपटाची ‘पिफ’ २०२६ मध्ये निवड
पुणे | प्रतिनिधी (अनिस मोमीन)
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) २०२६ अंतर्गत होणाऱ्या मराठी चित्रपट स्पर्धा विभागासाठी सात चित्रपटांची निवड जाहीर करण्यात आली असून, यात कडा (ता. आष्टी) गावाचे सुपुत्र, दिग्दर्शक रवींद्र जाधव यांच्या ‘जीव’ या चित्रपटाचा समावेश झाल्याने बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे.
पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी पुण्यातील ई-स्क्वेअर चित्रपटगृह येथे, तर समारोप व पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे.
मराठी चित्रपट स्पर्धा विभागात निवडलेले चित्रपट
मराठी चित्रपट स्पर्धा विभागासाठी खालील सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे –
आदिशेष – दिग्दर्शक: रमेश मोरे
तो, ती आणि फुजी – दिग्दर्शक: मोहित टाकळकर
तिघी – दिग्दर्शक: जिजीविशा काळे
जीव – दिग्दर्शक: रवींद्र जाधव
गोंधळ – दिग्दर्शक: संतोष डावखर
गमन – दिग्दर्शक: मनोज नाईकसाटम
बाप्या – दिग्दर्शक: समीर तिवारी
यातील ‘जीव’ या चित्रपटाची निवड ही कडा गावासाठी विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे.
ज्येष्ठ कलाकारांचा विशेष सन्मान
भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी यंदाच्या महोत्सवात –
ज्येष्ठ अभिनेते विस्वजित चॅटर्जी,
ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल,
ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे,
ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार अमर हलदीपूर
यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत घोषणा
महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी याबाबतची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे आणि अदिती अक्कलकोटकर उपस्थित होते.
नोंदणीची माहिती
महोत्सवासाठीची नोंदणी http://www.piffindia.com या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा देश-विदेशातील दर्जेदार चित्रपट, दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपटप्रेमींना एकत्र आणणारा प्रतिष्ठित मंच असून, यंदाच्या महोत्सवात मराठी चित्रपटांची भक्कम उपस्थिती आणि रवींद्र जाधव यांच्या ‘जीव’ चित्रपटाची निवड ही निश्चितच मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवास्पद बाब ठरणार आहे.



stay connected