महामार्ग रुंदीकरणासाठी आ. सुरेश धस यांचा आदर्श : माझ्या निवासस्थानासमोरचे अगोदर काढा आ.धस यांनी प्रशासनाला केली विनंती

 महामार्ग रुंदीकरणासाठी आ. सुरेश धस यांचा आदर्श :
माझ्या निवासस्थानासमोरचे अगोदर काढा आ.धस यांनी प्रशासनाला केली विनंती




आष्टी (प्रतिनिधी) 


बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ हा आष्टी शहरातून जात असून या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम शासनाच्या निर्णयानुसार सुरू आहे. आष्टी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्ता रुंदीकरणासाठी महामार्गालगत असलेले नियमबाह्य पत्र्याचे शेड, कुंपणे व अडथळे स्वेच्छेने काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

   या पार्श्वभूमीवर मराठवाडा भूषण आमदार सुरेश  धस यांनी लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आवाहन न करता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या स्वतःच्या घरासमोरील महामार्गाच्या रुंदीकरणात येणारी ‘मियावाकी’ पद्धतीची वृक्ष लागवड काढून घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “माझी वृक्ष लागवड अगोदर काढा, म्हणजे इतर नागरिकांना व व्यावसायिकांना वेगळा व सकारात्मक संदेश जाईल.”आमदार धस यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाने त्यांच्या घरासमोरील वृक्ष लागवड हटवण्याची कार्यवाही प्रथम सुरू केली. वैयक्तिक पातळीवर केलेली ही वृक्ष लागवड पर्यावरणपूरक असली, तरी शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी रस्ता रुंदीकरण अधिक आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी कोणताही विरोध न करता सहकार्याची भूमिका घेतली.

शासन निर्णयानुसार आष्टी शहराच्या हद्दीबाहेरील रस्त्याची रुंदी व शहरातील हद्दीतील रुंदीकरण वेगवेगळ्या निकषांनुसार करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे पत्र्याचे शेड, बांधकामे व वृक्ष लागवड हटवण्याची मोहीम सुरू आहे. आमदार धस यांनी स्वतः पुढाकार घेतल्यामुळे अनेक नागरिक व व्यावसायिकांनीही आपल्या घरासमोरील अडथळे स्वेच्छेने काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून प्रथम स्वतः त्याग करून नंतर नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवण्याचा हा आदर्श आ. सुरेश धस यांनी घालून दिला असून, आष्टी शहराच्या विकासासाठी लोकसहभागातून मोठे परिवर्तन शक्य आहे, हा विश्वास त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.